दिल्लीतील पराभवाचे खापर 'ईव्हीएम'वर फोडू नका

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 एप्रिल 2017

पक्षाचे महत्त्वाचे निर्णय बंद खोलीत का होतात? आम्ही पारदर्शक लोकशाहीचा दावा करत असू, तर त्याच्याशी हे विसंगत आहे.
- कुमार विश्‍वास, नेते, "आप'

कुमार विश्‍वास यांचे "आप'वरच टीकास्त्र

नवी दिल्ली: दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्षातून (आप) बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. पक्षनेते कुमार विश्‍वास यांनी स्वपक्षावर जाहीरपणे पुन्हा टीकेची झोड उठवताना, "सर्जिकल स्ट्राइक'वरून अरविंद केजरीवाल यांचा नरेंद्र मोदींबाबतचा संशय व पराभवाबद्दल "ईव्हीएम'वर खापर फोडण्याच्या प्रकारांशी स्पष्ट व जाहीर असहमती दर्शविली आहे. विश्‍वास आगामी काही दिवसांत भाजपमध्ये सामील होऊ शकतात, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने "सकाळ'ला सांगितले. मात्र भाजप नेतृत्वाला त्यांच्याबरोबर केजरीवाल यांचे बरेच आमदारही फुटावेत, अशी अपेक्षा आहे व ती पूर्ण होताच केजरीवाल यांना जाहीर दणका दिला जाईल, असेही या नेत्याने सूचित केले.

पक्षाच्या व्यापारी सेलचे संयोजक ब्रजेश गोयल, तसेच अनेक आमदारांनीही प्रसारमाध्यमांना गाठून आपली नाराजी जाहीर करणे सुरू केले आहे. कुमार विश्‍वास यांना राज्यसभेत पाठविण्याचे आश्‍वासन केजरीवाल पाळणार नाहीत, असे दिसल्यावर विश्‍वास बिथरल्याचे सांगितले जाते. केजरीवाल यांचा विशेषतः मनीष सिसोदिया यांचा कल दिल्लीतील दोन जागांसाठी पत्रकार आशुतोष व प्रवक्ते आशिष खेतान यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. विश्‍वास यांची कवी म्हणून प्रतिमा व त्याचे वक्तृत्व यामुळे राज्यसभेवर त्यांना पाठविले जाईल, असे संकेत केजरीवाल हेच यापूर्वी देत असत. प्रत्यक्षात त्यांची भाषा बदलल्याचे दिसताच विश्‍वास यांनी दिल्लीतील पराभवानंतर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक व्हिडिओ जारी करून कवितेद्वारे केजरीवालांवर निशाणा साधला होता.

"सर्जिकल स्ट्राइक'नंतर केजरीवाल यांनी मोदींविरुद्ध ओकलेल्या गरळीविरुद्ध विश्‍वास यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर दिल्लीतील निवडणुकांत "ईव्हीएम'ने नव्हे तर जनतेने आम्हाला नाकारले हे नेतृत्वाने स्वीकारायला हवे, असाही सल्ला दिला आहे.

Web Title: kumar vishwas attack on arvind kejriwal and evm