Cheetah : कुनोतील वातावरणात चित्ते रुळायला लागले!

आहार-विहारावर तज्ज्ञांचे लक्ष; टास्क फोर्सकडून नियमित अहवाल
Cheetah
Cheetah Esakal

भोपाळ : नामिबियातील आठ चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडून आठवडा झाला. या चित्त्यांवर पाच पशुवैद्यकीय अधिकारी आणि नामिबियातील तज्ज्ञ लक्ष ठेवून अहेत. चित्यांची सतत आरोग्य तपासणी केली जात असून ते वातावरणाशी जुळवून घेत असल्याचे व उत्साही असल्याचे सूत्राने सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये कुनोतील चित्ते पाहण्याचा निर्णय टास्क फोर्सच्या अहवालानंतर घेतला जाईल, असे नमूद केले. चित्त्यांच्या हालचालीवर आणि भोजनावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. उद्यान व्यवस्थापनाकडून नियमितपणे केंद्र सरकारला अहवाल पाठविला जात आहे.

नामिबियाच्या पाच तज्ज्ञांचे पथक चित्त्यांच्या दिनक्रमावर लक्ष ठेवत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी तिघे मायदेशी परतले. ते नामिबियाहून चित्त्यांच्या आहारावर लक्ष ठेवत आहेत. याशिवाय डॉ. ओंकार अचल आणि डॉ. जितेंद्र जाटव हे दोघे स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी असून ते चित्त्यांची काळजी घेत आहेत.

कुनो राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वनाधिकारी प्रकाशकुमार वर्मा यांनी सांगितले, की चित्त्यांची दिनचर्या ही पहिल्या दिवसांपासून साधारण असून ते कुनो येथे आणल्यापासून सक्रिय आहेत. सध्या या चित्त्यांना सहा बंदिस्त ठिकाणी ठेवण्यात आले आहे. दोन ठिकाणी प्रत्येकी दोन चित्ते असून उर्वरित चार चित्ते हे वेगळ्या बंदिस्त जागेत ठेवण्यात आले आहेत. चित्त्यांच्या हालचालींवर आणि त्यांच्या बदलावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने टाक्स फोर्स स्थापन केला आहे. हा टास्क फोर्स वन खात्याचे मुख्य सचिव अशोक बर्नवाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.

टास्क फोर्सकडून चित्त्यांच्या हालचालीवर अहवाल तयार करण्यास सुरवात केली आहे. या अहवालानंतर चित्त्यांचा विलगीकरणाचा काळ कधी संपवायचा आणि त्यांना जंगलातील मोठ्या आवारात कधी सोडायचे हे ठरविण्यात येणार आहे. याशिवाय उद्यानाचे पर्यटन कधी सुरू करायचे यावर टास्क फोर्स निर्णय घेणार आहे. येत्या जानेवारी २०२३ रोजी पर्यटकांसाठी कुनो प्राणिसंग्रहालय खुले करण्यात येणार आहे.

देखरेखीसाठी दोन हत्ती तैनात

सातपुडा वाघ अभयारण्यातून आणलेल्या दोन हत्तींमार्फत चित्त्यांची सुरक्षा पाहिली जात आहे. हे हत्ती जंगलातील अन्य प्राण्यांना चित्त्यापासून दूर ठेवण्याचे काम करत आहेत. शिकाऱ्यांकडून चित्त्यांना धोका नाही. कारण प्रत्येक चित्ता हा सॅटेलाइट कॉलर युक्त आहे. या माध्यमातून २४ तास त्याच्या लोकेशनवर लक्ष ठेवणे शक्य आहे. एकाच ठिकाणी दोन किंवा चार तासांपेक्षा अधिक हालचाल दिसली नाही तर लगेच ॲलर्ट मेसेज वनाधिकाऱ्यांपर्यंत पोचतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com