शबरीमला प्रवेशासाठी "महिलांची 630 किलोमीटरची भिंत'

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

शबरीमला प्रवेशासाठी "महिलांची 630 किलोमीटरची भिंत'
केरळ सरकारपुरस्कृत मोहिमेत 630 किलोमीटरची साखळी

तिरुअनंतपुरम- लिंग समानता व प्रबोधन मूल्याची जपणूक करण्यासाठी केरळ सरकारपुरस्कृत "महिलांची भिंत' या उपक्रमाला पाठिंबा देत समजातील विविध स्तरांतील हजारो महिलांनी यात भाग घेतला. यात उत्तर केरळमधील कासारगोड ते दक्षिणेकडील तिरुअनंतपुरमपर्यंत 620 किलोमीटर लांबीची साखळी महिलांनी तयार केली.

शबरीमला मंदिरात 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याचे पालन करण्याचा निर्णय केरळमधील डाव्या आघडीच्या सरकारने घेतला. मात्र त्याला विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना आणि अय्यप्पाभक्तांनी तीव्र विरोध केला. शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न काही महिलांनी केला. त्याविरोधात आंदोलन करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर "महिलांची भिंत' उपक्रम राबविण्यात आला. राज्याच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी कासारगोड येथील महिलांच्या साखळीचे नेतृत्व केले. या साखळीचे शेवटचे टोक तिरुअनंतपुरम येथे होते. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा करात या साखळीतील शेवटच्या महिला होत्या.

"महिलांची भिंत' उपक्रमात सरकारी कर्मचारीही सहभागी होणार असल्याची माहिती देवस्वम मंत्री कडककामपल्ली सुरेंद्र यांनी दिली होती. याकाळात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी चोख यवस्था ठेवली होती. या उपक्रमात 30 लाख महिला सहभागी होतील, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली होती. यानिमित्त काही जिल्ह्यांमधील शाळांना दुपारी सुटी देण्यात आली; तर आजच्या नियोजित परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलल्या आहेत. सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी; तसेच 176 सामाजिक व राजकीय संघटनांनी हा उपक्रम आयोजित केला आहे. यात श्री नारायण धर्म परिपालन योगम आणि केरळ पुलायार महासभा यांचा समावेश आहे. केरळमधील नायर समुदायाची मुख्य संस्था "द नायर सर्व्हिस सोसायटी' आणि "इंडियन युनियन मुस्लिम लीग' ही संघटना यात सहभागी होणार नाही.

महिलांच्या भिंतीला विरोध करण्यासाठी शबरीमला कर्म समिती आणि भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; तसेच अन्य उजव्या संघटनांनी 26 डिसेंबरपासून अय्यप्पा ज्योत राज्यभरात फिरविण्यास सुरवात केली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष 
कासरगोड येथून महिलांची भिंत उभारण्यास सुरवात झाली. तेथे महिला रांगेत उभ्या राहत असताना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले व त्यांच्यात संघर्ष झाला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. 

केरळमधील महिलांसाठी हा ऐतिहासिक दिवस ठरला. काही संघटना राज्याला पुन्हा अंधारयुगात ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण महिला त्यांना असे करू देणार नाहीत. वृंदा करात, कम्युनिस्ट नेत्या 

Web Title: Lakhs of Kerala women form 620-km long renaissance wall