...म्हणून जामीन मिळूनही लालूप्रसाद यादव तुरुंगातच!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

- चारा गैरव्यवहारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) जामीन मंजूर केला.

रांची : चारा गैरव्यवहारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) जामीन मंजूर केला. मात्र, इतर दोन प्रकरणामध्ये शिक्षा झाल्याने त्यांना सध्यातरी तुरुंगातच राहावे लागणार आहे.  

देवघर कोषागार प्रकरणात सुनावण्यात आलेल्या शिक्षेपैकी निम्म्याहून अधिक कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना रांची उच्च न्यायालयाने प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या हमीवर त्यांचा जामीन मंजूर केला. मात्र, लालूप्रसाद यादव यांनी आपला पासपोर्ट न्यायालयात जमा करावा, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

चारा गैरव्यवहारप्रकरणी यापूर्वी 5 जुलैला सुनावणी झाली होती. त्यावेळी रांची उच्च न्यायालयाकडून लालूप्रसाद यादव यांना जामीन मिळाला नाही. मात्र, आता त्यांना जामीन मंजूर झाला आहे. 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव यांना सध्या मोठा दिलासा मिळाला असला तरी त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lalu Prasad Yadav granted bail but he will not leave from Jail