नवीन "ईव्हीएम' यंत्रे निवडणुकीनंतरच का घेतली?: लालू

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर नवीन अत्याधुनिक मतदान यंत्र खरेदी करण्यामागे काय कारण आहे,?

पाटणा - इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात होणाऱ्या फेरफाराबद्दल आम आदमी पक्ष, कॉंग्रेस यांसह बहुतेक विरोधी पक्षांकडून चौफेर टीका होत आहे. "देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर नवीन अत्याधुनिक मतदान यंत्र खरेदी करण्यामागे काय कारण आहे,?' असा प्रश्‍न राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी निवडणूक आयोगाला विचारून या वादात उडी घेतली आहे.

सदोष मतदान यंत्रांबाबत लालूप्रसाद यांनी ट्‌विट केले आहे. "मतदान यंत्रांमधील फेरफाराबाबत एवढे वादळ उठण्याचे कारण काय आहे? जर फेरफार झालेला नाही, तर जुनी दहा लाख ईव्हीएस यंत्रे बदलली का?, पाच राज्यांमधील निवडणुकांपूर्वीच ही यंत्रे का बदलली नाहीत?, अशा प्रश्‍नांची सरबत्तीच लालू यांनी केली आहे.

मध्य प्रदेशमधील ईव्हीएम यंत्रांच्या चाचणीप्रसंगी यावरून कोणत्याही पक्षासमोरील बटण दाबले तरी ते मत भाजपलाच जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत "आप'च्या नेत्या नेहा बग्गा यांनी केलेल्या ट्विटची पाठराखण करताना "मतदान यंत्रांमधील फेरफाराची घटना खरोखरच अत्यंत गंभीर व धोकादायक आहे. लोकशाहीच्या आरोग्यास हे घातक आहे,' असे लालू यांनी म्हटले आहे.

Web Title: Lalu Prasad Yadav questions timing of New EVMs