चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणी लालु दोषी

वृत्तसंस्था
सोमवार, 19 मार्च 2018

गेल्या 6 जानेवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने लालुप्रसाद यांना आणखी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान दोषी करार देत साडेतीन वर्षांचा कारावास व 10 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. राजद बिहारमध्ये सत्तेत असताना (1990) करण्यात आलेल्या या गैरव्यवहाराची व्याप्ती एकूण 900 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले आहे

रांची - राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालुप्रसाद यादव हे पशु खाद्य विक्रीसंदर्भातील अन्य एका प्रकरणी दोषी असल्याचा निकाल विशेष सीबीआय न्यायालयाने आज (सोमवार) सुनावला. या प्रकरणी येत्या शुक्रवारी शिक्षा सुनावली जाण्याची शक्‍यता आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना मात्र या प्रकरणी न्यायालयाने दोषमुक्त केले.

या प्रकरणी एकूण 19 आरोपी दोषी आढळले असून 12 जणांना मुक्त करण्यात आले आहे. पशुखाद्य विक्री गैरव्यवहारसंदर्भातील हे चौथे प्रकरण असून यामध्ये लालुप्रसाद यांच्यावर 3.13 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती राजदचे ज्येष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह यांनी दिली. लालुप्रसाद यांच्याविरोधात या गैरव्यवहारसंदर्भातील आणखी एक प्रकरण नोंदविण्यात आले असून त्याची सुनावणी अद्यापी बाकी आहे.

गेल्या 6 जानेवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने लालुप्रसाद यांना आणखी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान दोषी करार देत साडेतीन वर्षांचा कारावास व 10 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. राजद बिहारमध्ये सत्तेत असताना (1990) करण्यात आलेल्या या गैरव्यवहाराची व्याप्ती एकूण 900 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले आहे.

Web Title: laluprasad yadv convicted in another fodder scam case