road
road

गोवा सरकारचा मोठा निर्णय; महामार्ग भू संपादनाची सर्वांनाच भरपाई

पणजी : राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जमिनीच्या 1-14 उताऱ्यांवर ज्यांची नावे आहेत. त्या सगळ्यानांच भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्याशिवाय महामार्ग रुंदीकरणात साठवून ठेवलेली माती, घातलेला मातीचा भराव कोसळून पावसाळ्यात रस्ता अपघातग्रस्त बनू नये यासाठी येत्या आठवडाभरात आवश्‍यक ती उपाययोजना करण्याची सूचनाही राज्य सरकारने आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली आहे. पोरस्कडे येथील श्री देवी माऊलीचे मंदिर न हटवता रस्ता दुसरीकडे हलवण्याचेही आज ठरवण्यात आले. 

मंत्रालयातील परिषद सभागृहात काल उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, महसूलमंत्री रोहन खंवटे, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीत महामार्ग रुंदीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्याचवेळी मार्गाच्या रुंदीकरणावेळी बाजूला सरळ कापण्यात आलेला डोंगर, रस्ता उंच करण्यासाठी घातलेला भराव यांची माती पावसात रस्त्यावर येऊन दुचाकीधारकांसाठी ती धोकादायक ठरू शकते याकडे लक्ष वेधण्यात आले. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

पाऊसकर यांनी या बैठकीनंतर सांगितले, की भू संपादनाचा प्रश्‍न चर्चेला आला होता. त्यावेळी 1-14 उताऱ्यावर ज्यांची नावे मालक, कूळ, भोगवटादार म्हणून नोंद आहेत त्या साऱ्यांनाच भरपाई देण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यांच्यात त्या भरपाईच्या वाटणीवरून वाद असेल तर न्यायालयात भरपाई जमा करून सरकार काम पुढे नेणार आहे. आता केवळ भरपाईच्या कारणास्तव महामार्गाचे काम अडणार नाही. तसेच पावसाळापूर्व कामेही वेगाने हाती घेण्याचे निर्देश महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. खड्डे बुजवण्याचे काम राणे नामक कंत्राटदाराकडे सोपवण्यात आले असून हॉटमिक्‍स पद्धतीनेच ते खड्डे बुजवण्यास सांगितले आहे. 

महामार्गाच्या रुंदीकरणावेळी दोन ठिकाणी गावांसाठी रस्ते बांधावे लागणार आहेत अशी बाब पुढे आली आहे. त्यासाठी वाढीव 150 कोटी रुपयांच्या कामाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्याची चर्चा आजच्या बैठकीत झाल्याचे सांगून ते म्हणाले, पर्वरी येथे ओ कोकेरो चौक ते तीन बिल्डींग असा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. तो पूल पाच मीटर ऐवजी सहा मीटर उंच बांधला जाणार आहे. अल्पावधीत त्या कामास सुरवात होणार आहे. या बैठकीला कुठ्ठाळीच्या आमदार अलिना साल्ढाना, सार्वजनिक बांधकाम खाते, महसूल खाते, महामार्ग प्राधिकरण आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

महसूलमंत्री रोहन खंवटे म्हणाले, पत्रादेवी ते बांबोळी टप्प्यातील भू संपादन अडले होते. दीड वर्षे हा प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न होते. शेतकरी अनेक वर्षे जमीन कसत होते तर त्याना भरपाई मिळालीच पाहिजे असे आमचे म्हणत होते. भू संपादन अधिकाऱ्यांनी हा विषय जरा वेगळ्या पद्धतीने हाताळल्याने काही प्रश्‍न निर्माण झाला होता. तो सोडवण्याचा निर्णय आज झाला आहे. न्यायालयात हे खटले प्रलंबित असतानाही हा निर्णय घेतला गेला आहे. ज्यांना भरपाई मिळायची आहे त्यांना ती मिळणार आहे. आठवडाभरात तसा आदेशही जारी होणार आहे. भरपाई अदा करण्याचे काम महसूल खात्यातर्फे होते.आजवर भरपाई कोणाला द्यावी याच मुद्यावर अनेक ठिकाणी कामे अडली होती. आता त्याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. याचा फायदा सगळ्यांनाच होईल 

उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर म्हणाले, पोरस्कडे येथील माऊली मंदिर रस्ता रुंदीकरणात हटवावे लागणार होते. आजच्या बैठकीत हे मंदिर न हटवता रस्ताच थोडा दुसरीकडून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्ग रुंदीकरणामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, माती सांडली आहे. त्यामुळे कित्येक अपघात होत आहेत. पावसाळ्यात त्यांचे प्रमाण वाढू शकते. यास्तव आताच उपयायोजना केली पाहिजे हा मुद्दा मी जोरकसपणे मांडला. सगळ्यांना विश्‍वासात घेऊन प्रश्‍न सोडवला पाहिजे. खड्डे बुजवले पाहिजेत. पावसाळ्यात रस्ता सुरक्षित असला पाहिजे.युद्धपातळीवर हे काम करण्याची सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही केली आहे. 

ताज्या आणि अचूक बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा 'सकाळ' चे मोबाईल ऍप! 
https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com