Chandrayaan 2 : शेवटची 15 मिनिटे जिकिरीची...

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जुलै 2019

'चांद्रयान-2' सुमारे 30 किमी उंचीवरून पृष्ठभागाकडे झेपावेल. यासाठी 15 मिनिटे वेळ लागेल. हा कालावधी अत्यंत आव्हानात्मक असेल. 

चांद्रयान-2 प्रक्षेपणानंतर 53-54 दिवसांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सहा सप्टेंबरला दाखल होईल. पृष्ठभागावर हे यान सुरक्षित व यशस्वीपणे उतरणे हे अत्यंत जिकिरीचे काम असेल. 'चांद्रयान-2' सुमारे 30 किमी उंचीवरून पृष्ठभागाकडे झेपावेल. यासाठी 15 मिनिटे वेळ लागेल. हा कालावधी अत्यंत आव्हानात्मक असेल. 

'चांद्रयान-2'चा असा असेल प्रवास 
- 22 जुलै 2019 रोजी दुपारी 02.43 : श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून "जीएसएलव्ही मार्क 3'द्वारे प्रक्षेपण. 
- यान पृथ्वीभोवती 170 किलोमीटर बाय 40,400 किलोमीटरच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात येईल. 
- यानाची पृथ्वीभोवतीची कक्षा पुढील 16 दिवसांमध्ये पाच टप्प्यांमध्ये चंद्राच्या कक्षेपर्यंत विस्तारण्यात येईल. 
- चांद्रयान-2 ला चंद्राभोवती 100 किलोमीटर बाय 100 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. 
- 6 सप्टेंबर 2019 रोजी लॅंडर आणि बग्गी मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर लॅंडरवर बसविण्यात आलेल्या इंधन यंत्रणेच्या साह्याने त्याची चंद्राभोवतीची कक्षा 100 बाय 30 किलोमीटरची करण्यात येईल. 
- याच कक्षेत चंद्राच्या जमिनीपासून 30 किलोमीटरवर असताना "विक्रम' आणि "प्रग्यान' चंद्राच्या दक्षिण गोलार्धात 70 अक्षांशांवर उतरविण्याची प्रक्रिया साधली जाईल. 
- "विक्रम' आणि "प्रग्यान' यांचा चंद्रावरील कार्यकाळ एका चांद्रदिवसाचा म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवसांचा असेल. या 14 दिवसांच्या काळात "विक्रम' आणि "प्रग्यान'ला सूर्यप्रकाशामुळे ऊर्जा मिळू शकेल. 
- "विक्रम' लॅंडर चंद्रावर उतरल्यावर त्याचे दार उघडेल. त्यानंतर चार तासांनी त्यातून "प्रग्यान' बग्गी बाहेर येईल. 
- चंद्राच्या जमिनीवर सेकंदाला एक सेंटिमीटर या गतीने "प्रग्यान' साधारणपणे 500 मीटर अंतर कापेल. 
- पुढील 14 दिवसांत विविध शास्त्रीय नोंदी घेण्यात येतील. 
- सात वैज्ञानिक उपकरणांसह चंद्राभोवती 100 किलोमीटरच्या कक्षेतून फिरणारे यान पुढील एक वर्ष नोंदी घेईल. 

chandrayan

खर्च 
603 कोटी रुपये - निर्मितीसाठी 
375 कोटी रुपये - प्रक्षेपणासाठी 

सहभाग 
500 - विद्यापीठे 
120 - कंपन्या 

चौथा देश 
ही मोहीम पूर्णपणे यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया व चीननंतर चंद्राच्या पृष्ठभागावर बग्गी उतरविणारा भारत चौथा देश ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: last 15 minutes are critical for Chandrayan 2