अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीमध्ये त्यांचे अखेरचे दर्शन घेतले.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे काल (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर आज (शुक्रवार) दिल्लीतील राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ''अटलबिहारी अमर रहे, वंदे मातरम्'', अशा घोषणांनी अत्यंत शोकाकुल वातावरणात अटलबिहारी वाजपेयी यांना अखेरचा निरोप देण्यात आला. 

अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात ठेवण्यात आले होते. त्यावेळी भाजपसह विविध पक्षांच्या नेत्यांनी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर वाजपेयींच्या अंत्ययात्रेला सुरवात झाली. या अंत्ययात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी पायी जात सहभाग घेतला.

तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीमध्ये त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान, तिन्ही सेनादलप्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण करुन अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांना 300 जवानांनी मानवंदना दिल्या.

Web Title: The last salute to Atal Bihari Vajpayee