मागील 3 आठवड्यांपासून कोरोनाचा प्रभाव उतरणीला

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 9 October 2020

देशात कोरोनाचा प्रसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाढताना दिसला होता. पण मागील तीन आठवड्यांची देशातील कोरोनाची परिस्थिती पाहिली तर दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे.

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाढताना दिसला होता. पण मागील तीन आठवड्यांची देशातील कोरोनाची परिस्थिती पाहिली तर दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 3 आठवड्यांपासून देशात कोरोनाच्या नवीन रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

मागील तीन आठवड्यांतील देशातील कोरोनाच्या आकडेवारीचा ट्रेंड बदलताना दिसला आहे. 18 ते 24 सप्टेंबर दरम्यान देशात कोरोनाच्या 6 लाख 14 हजार 265 कोरोना रुग्णांचं निदान होऊन 6 लाख 49 हजार 908 कोरोनातून बरे झाले होते. या आठवड्यात नवीन रुग्णांपेक्षा जवळपास 33 हजार जास्त कोरोना रुग्ण बरे झाले होते. त्यानंतरच्या आठवड्यात 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर मध्ये 5 लाख 80 हजार 66 जणांना कोरोनाची बाधा झाली होती तर 5 लाख 98 हजार 214 जण कोरोनामुक्त झाले होते.

बिहार निवडणूक - माजी DGP गुप्तेश्वर पांडेंवर भारी पडला माजी पोलिस कॉन्स्टेबल

गेल्या आठवड्यात म्हणजे 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान देशात 5 लाख 23 हजार 71 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले होते तर 5 लाख 54 हजार 503 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. जर मागील 3 आठवड्यांचा विचार केला तर नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसले आहे. 

इस्लामिक स्टेटच्या संपर्कातील दोघे ताब्यात; 14 जणांना पाठवले सीरियाला

कोरोनाचे मागील 24 तासांत देशात 70 हजार 496 नवीन रुग्ण आढळून 964 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामुळे देशातील सध्याचा कोरोनाने बाधित झालेल्यांचा आकडा 69 लाखांच्या वर गेला आहे. देशात सध्या 8 लाख 93 हजार 592 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशातील 59 लाख 6 हजार 70 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच देशातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 6 हजार 490 झाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: from last three weeks corona recoveries is greater than new cases