पान, चहा अन्‌ कादंबरी! 

मंगळवार, 8 मे 2018

नवी दिल्ली - महाराष्ट्राची सीमा ओलांडून कुणी एक मराठी माणूस दिल्लीत जातो. तिथे पदपथावर चहा विकता विकता अनेक हिंदी कादंबऱ्या लिहितो. या गोष्टीचे आश्‍चर्य वाटेल; पण ती खरी आहे. 

नवी दिल्ली - महाराष्ट्राची सीमा ओलांडून कुणी एक मराठी माणूस दिल्लीत जातो. तिथे पदपथावर चहा विकता विकता अनेक हिंदी कादंबऱ्या लिहितो. या गोष्टीचे आश्‍चर्य वाटेल; पण ती खरी आहे. 

लक्ष्मणराव शिरभाते हे त्या साहित्यिकाचे नाव. नवी दिल्लीत विष्णू दिगंबर मार्ग येथे हिंदी भवनाला लागूनच त्यांचा चहा विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची 24 पुस्तके, कादंबऱ्या "लक्ष्मण राव' या नावाने प्रसिद्ध झाल्या आहेत. ते मूळचे अमरावतीचे. तेथील स्पिनिंग मिल बंद पडल्यानंतर ते भोपाळला गेले. तिथे मजुरी केली. नंतर दिल्लीत आले. मजुरीची कामे करीत असताना त्यांनी विष्णू दिगंबर रस्त्यावर 1977 मधे पानविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यादरम्यान त्यांची "रामदास' ही कादंबरी प्रकाशित झाली. पुढे रस्त्यावर चहाविक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. भोवताली घडणाऱ्या घटना, वाचलेली माणसे त्यांनी कादंबरीत बांधली. एक एक करीत त्यांनी स्वत:ची 24 पुस्तके लिहिली. 

लक्ष्मणराव हे दहावी शिकलेले होते. नंतर बारावी, बीए आणि एमएपर्यंतचे शिक्षणदेखील त्यांनी पूर्ण केले. आता त्यांना एमए इंग्रजी करायचेय. आजही ते दररोज पदपथावर बसून चहाविक्रीचा व्यवसाय करतात. 

दिवसभर कष्ट करून पुस्तक लिहायला वेळ कधी मिळतो, या प्रश्नावर ते सांगतात, "सकाळी सातपासून एक वाजेपर्यंत वाचन आणि लेखन करतो. नंतर चहा विक्री. हीच आता दिनचर्या आहे.' 

लक्ष्मणरावांनी दोन्ही मुलांना चांगले शिकवले आहे. एक मुलगा एमबीए करून बॅंकेत काम करतो, तर दुसरा अकाउंटंट आहे. अनेक कादंबऱ्या लिहूनही कष्टाची कामे करावी लागतात, याबद्दल त्यांना खंत वाटत नाही. जेव्हा जवळ काही नव्हते तेव्हाही आनंदी होतो, आजही आनंदीच आहे, असं ते आवर्जून सांगतात. स्वत:च घर मात्र त्यांना घेता आलेले नाही. 

तंत्रज्ञानाचा वापर 
पुस्तकांच्या आवृत्त्या छापण्यासाठी अधिक पैसा लागतो. त्यातून त्यांनी मार्ग काढलाय. पुस्तकांच्या ऑनलाइन प्रती देखील आहेत. ऍमेझॉन, फ्लिपकार्टवर त्यांची पुस्तके मिळू लागली आहेत. आतापर्यंत 20 हजार पुस्तके विकली गेल्याचे ते सांगतात. त्यांच्या या कार्याचा गौरवही अनेक ठिकाणी झाला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रानेही त्यांचा सन्मान केला आहे. 

गुलशन नंदा यांची पुस्तके मी वाचत होतो. मग ठरवले, आपणही त्यांच्यासारखं लेखक व्हायचे. ते स्वप्न मी कधीच सोडले नाही. वाचत राहिलो आणि लिहित राहिलो. त्यातून ही ग्रंथसंपदा तयार झाली; पण अजून स्वत:चे घर नाही. पण हेही दिवस बदलतील. पुस्तक, कादंबरी हेच आता माझे विश्‍व आहे. 
- लक्ष्मणराव शिरभाते (हिंदी साहित्यिक, नवी दिल्ली) 

Web Title: Laxmanrao shirbhate 24 books written on Delhi footpath