डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामींवर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

रायबाग - कोल्हापूर येथील जैन मठाचे मठाधीश स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 21) दुपारी तीन वाजता येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटक - महाराष्ट्रातील विविध मठांचे मठाधीश, मान्यवर व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या. 

रायबाग - कोल्हापूर येथील जैन मठाचे मठाधीश स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 21) दुपारी तीन वाजता येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटक - महाराष्ट्रातील विविध मठांचे मठाधीश, मान्यवर व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या. 

जैन तत्त्वज्ञान, शैक्षणिक, सामाजिक व साहित्य चळवळींचे प्रणेते असलेल्या डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामींचे कोल्हापूर येथे गुरुवारी (ता. 20) पहाटे महानिर्वाण झाले. शुक्रवारी (ता. 21) महास्वामींच्या पार्थिवाचे रायबाग येथे सकाळी 10.30 वाजता आगमन झाले. त्यानंतर जैन मठात पूजाविधी झाल्यावर आबाजी सर्कलमार्गे नंदीकुरळी रस्त्यावरील निषिदी या ठिकाणापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यविधीच्या ठिकाणी दुपारी एकच्या सुमारास पार्थिवाचे आगमन झाले. त्यानंतर जैन धर्माच्या परंपरेनुसार विविध धार्मिक विधी करण्यात आले. परंपरेनुसार महास्वामींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक महास्वामी, चिंचणी मठाचे अल्लमप्रभू स्वामी, मुडबिद्री, यल्लापूर, हुन्शाळसह महाराष्ट्र-कर्नाटकातील मठाधीश, भट्टारक तसेच बेळगाव, कोल्हापूर, सांगली, विजापूर, बागलकोटसह अन्य जिल्ह्यातील मान्यवर व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.

आमदार डी. एम. ऐहोळे, आमदार विवेकराव पाटील, आमदार अभय पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, सहकाररत्न रावसाहेब पाटील-बोरगाव, माजी आमदार संजय पाटील, कल्लाप्पाण्णा मगेण्णावर, जिल्हा बॅंक संचालक अप्पासाहेब कुलगुडे, जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पारिसा उगारे उपस्थित होते.

मूळचे तामिळनाडूचे असलेले महास्वामींचे कोल्हापूर, बेळगाव, रायबाग, होसूर मठाशी संबंध होते. महास्वामींचे कार्य मोठे असल्याने अंत्यदर्शनासह अंत्यविधीसाठी मोठी गर्दी झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laxmisen Bhattarak Mahaswamy Funeral