अलाहाबादच्या कुंभमेळ्यामुळे चर्म उद्योगावर 'संक्रांत'

पीटीआय
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

कानपूर : अलाहाबादमध्ये पुढील महिन्यात महाकुंभमेळा सुरू होत आहे. कुंभपर्वाला धार्मिक महत्त्व असल्याने कानपूर व उन्नावमधील मांसप्रक्रिया व चर्म व्यवसाय करणारे कारखाने तीन महिने बंद ठेवण्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिला आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या लाखो कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. 

कानपूर : अलाहाबादमध्ये पुढील महिन्यात महाकुंभमेळा सुरू होत आहे. कुंभपर्वाला धार्मिक महत्त्व असल्याने कानपूर व उन्नावमधील मांसप्रक्रिया व चर्म व्यवसाय करणारे कारखाने तीन महिने बंद ठेवण्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिला आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या लाखो कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. 

अलाहाबादमध्ये 15 जानेवारी ते 4 मार्च 2019 या कालावधीत कुंभमेळा भरणार आहे. कुंभमेळ्यासाठी येथे येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पाणी पुरविण्याच्या हेतूने उन्नाव व कानपूरमधील चर्म उद्योग 15 डिसेंबर ते 15 मार्च या कालावधीत बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. उत्तर प्रदेश राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (यूपीएसआयडीसी) माहितीनुसार उन्नाव व कानपूरमध्ये कातडी कमाविण्याचे काम करणारे एकूण 264 लघू व मोठे उद्योग आहेत. एक लाखापेक्षा जास्त कुटुंबांची उपजीविका या उद्येगावर अवलंबून आहे. मात्र, सरकारच्या आदेशामुळे चर्म व्यवसाय करणाऱ्या छोट्या कारखान्यांना मोठा फटका बसणार आहे, अशी भीती एका कारखान्याच्या मालकाने व्यक्त केली. 

"उत्तर प्रदेश लेदर इंडस्ट्रिज असोसिएशन'चे (एलआयए) अध्यक्ष ताज अलाम म्हणाले, की आधीच धोक्‍यात आलेल्या चर्म व मांसप्रक्रिया उद्योगासाठी राज्य सरकारचा हा निर्णय धक्कादायक आहे. तीन महिने उद्योग पूर्णपणे बंद ठेवण्यामुळे तीन लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. हे कामगार आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास समाजातील आहेत. चर्म व चर्म उत्पादनांची निर्यात आणि देशांतर्गत विक्रीतून कानपूर व उन्नावमध्ये प्रत्येकी महिन्याला दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. हे उद्योग बंद ठेवल्यास 12 हजार कोटींचा फटका बसेल, अशी भीती अलाम यांनी व्यक्त केली. 

अलाहाबादमध्ये यापूर्वी झालेल्या कुंभमेळ्यात शाही स्नानाच्या तारखेपूर्वी तीन- चार दिवस चर्म उद्योग बंद ठेवला जात असे. याबद्दलची माहिती मी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यानुसार मंत्रालयाने उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून ही बंदी तीन महिन्यांऐवजी काही ठराविक दिवस करावी असा सल्ला दिला आहे. 

- ताज अलाम, अध्यक्ष, उत्तर प्रदेश लेदर इंडस्ट्रिज असोसिएशन 

कुंभमेळ्याच्या काळात कानपूरमधील चर्म व्यवसाय पूर्ण तीन महिने बंद ठेवण्याचा आदेश सरकारने दिल्याचा दावा चुकीचा आहे. 259 चामडे उद्योगांना 50 टक्के व्यवसाय सुरू ठेवण्याची सूचना दिली आहे. 

- कुलदीप मिश्रा, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ 

चर्म व चर्म उत्पादनाची निर्यात (चर्म निर्यात परिषदेच्या माहितीनुसार) 

9,153.321 कोटी रु. 
2017-18 

9,624.193 कोटी रु. 
2016-17 

4.89 टक्के 
एकूण तूट 

Web Title: Leather Industry is in Problems due to the Kumbh Mela of Allahabad