बिनबुडाचे आरोप न थांबविल्यास कॉंग्रेसवर कायदेशीर कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने करण्याच्या मोहिमेने त्रस्त व संतप्त झालेल्या भाजपने प्रसंगी कायदेशीर कारवाईची धमकी आज कॉंग्रेसला दिली. बिनबुडाचे आणि खोटे आरोप करण्याचे न थांबविल्यास कॉंग्रेसवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे भाजपतर्फे बजावण्यात आले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने करण्याच्या मोहिमेने त्रस्त व संतप्त झालेल्या भाजपने प्रसंगी कायदेशीर कारवाईची धमकी आज कॉंग्रेसला दिली. बिनबुडाचे आणि खोटे आरोप करण्याचे न थांबविल्यास कॉंग्रेसवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे भाजपतर्फे बजावण्यात आले.

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना त्यांच्या हल्ल्याचे थेट लक्ष्य केलेले आहे. गुजरातचा वादग्रस्त व्यावसायिक महेश शहा याच्याकडे बेहिशेबी 13 हजार 860 कोटी रुपयांची रक्कम सापडली आणि त्याच्याशी भाजपच्या या दोन "शीर्ष नेत्यांचा' संबंध असल्याचे आरोप कॉंग्रेसतर्फे सातत्याने केले जात आहेत. एवढेच नव्हे, तर कॉंग्रेसने नोटाबदलीस उद्या 50 दिवस पूर्ण होण्याचा मुहूर्त साधून देशातील प्रमुख शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन या दोघा नेत्यांविरुद्ध वरील आरोप तसेच नोटाबदलीचे अपयश यावर ताशेरे झाडण्याचा उपक्रम राबविला. यामुळे तगमगलेल्या भाजपनेदेखील दिल्लीतच अर्थमंत्री अरुण जेटली, माहिती व प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू, दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद व कोळसा- ऊर्जामंत्री पीयूष गोयल या मंत्र्यांद्वारे कॉंग्रेस प्रचारमोहिमेला प्रत्युत्तर देण्याचा प्रकार केला.

रविशंकर व गोयल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसचा समाचार घेतला. गुजरातमधील एका बॅंकेचे अमित शहा संचालक आहेत. या बॅंकेत 500 कोटी रुपयांच्या नोटांचा भरणा करण्यात आला होता आणि या संशयास्पद व्यवहाराशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप कॉंग्रेसतर्फे केला जात आहे त्याचा उल्लेख करून रविशंकर यांनी तो फेटाळून लावला. या बॅंकेच्या गुजरातमध्ये 200 शाखा असून, अमित शहा आणि बॅंकेच्या संबंधांबाबत बॅंकेतर्फेच निवेदन केले जाईल आणि वस्तुस्थिती स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचा संदर्भ देऊन रविशंकर यांनी वर्तमान कॉंग्रेस पक्ष म्हणजे "पोरखेळ' असल्याचे म्हटले.

महेश शहाशी कोणताही संबंध नाही. शहाविरुद्ध कारवाई सुरू आहे. कॉंग्रेसकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी सादर करावेत, अन्यथा आरोप करणे थांबवावे, नाहीतर भाजप त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा विचार करेल असे सांगून रविशंकर म्हणाले, की वस्तुतः भ्रष्टाचार, गैरव्यवहारांना संरक्षण देणे, पाठीशी घालणे हेच काम कॉंग्रेसने गेली अनेक वर्षे केलेले आहे आणि त्याचे पुरावे टूजी स्पेक्‍ट्रम, कोळसा गैरव्यवहारांद्वारे समोर आलेले आहेत. मोदी सरकारने काळ्या पैशाविरुद्ध धाडसी मोहीम सुरू केल्याने हादरलेला कॉंग्रेस पक्ष वाटेल ते बेताल आरोप करीत सुटला आहे; परंतु ही मोहीम आता थांबणार नाही.

 

Web Title: Legal action will start against congress if not stopped allegations