लष्करे तैयबाचा कमांडर अयूब ललहारी ठार 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

गावात दहशतवादी असल्याची टीप मिळताच 47 राष्ट्रीय रायफल्सच्या नेतृत्वाखाली लष्कर आणि राज्य पोलिस दलाच्या विशेष पथकाने तपासणी मोहीम राबविली. 

श्रीनगर : पुलवामाच्या काकपोरा भागातील बांदेरपुरा येथे आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने लष्करे तैयबाचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी अयूब ललहारीला ठार केले.

सूत्राच्या माहितीनुसार, ललहारी हा लष्करे तैयबाचा रिझनल कमांडर होता. बांदेरपुरातील चकमकीत ललहारीला ठार करून सुरक्षा दलाने मोठी कामगिरी बजावल्याचे जम्मू- काश्‍मीरचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी म्हटले आहे. 

आज सकाळी एका घरात तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर तपासणी मोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार करताच जोरात चकमक सुरू झाली. त्या वेळी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला. त्याची ओळख पटली असून दहशतवादी अयूब ललहारी असे त्याचे नाव आहे. घटनास्थळी अजूनही चकमक सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गावात दहशतवादी असल्याची टीप मिळताच 47 राष्ट्रीय रायफल्सच्या नेतृत्वाखाली लष्कर आणि राज्य पोलिस दलाच्या विशेष पथकाने तपासणी मोहीम राबविली. 

Web Title: LeT commander #AyubLelhari killed in #encounter with security forces in J&K