करू द्या अटक, माफी मागणार नाही : गायकवाड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड हे आज आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. 'दिल्ली पोलिसांनी मला अटक करू द्या, मी माफी मागणार नाही', अशा शब्दांत त्यांनी आव्हान दिले आहे.

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड हे आज आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. 'दिल्ली पोलिसांनी मला अटक करू द्या, मी माफी मागणार नाही', अशा शब्दांत त्यांनी आव्हान दिले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले, "मी माफी मागणार नाही. ही माझी चूक नाही. ती त्याचीच चूक होती. त्यानेच माफी मागायला हवी. पहिल्यांदा त्याला माफी मागायला सांगा मग आम्ही विचार करू. दिल्ली पोलिसांनी मला अटक करू द्या. उद्धवजी ठरवतील पुढे काय करायचे ते. माझ्याकडे तिकिट आहे. ते मला ब्लॅकलिस्टमध्ये टाकू शकत नाहीत. आज संध्याकाळी मी दिल्लीहून पुण्याला जाणार आहे. ते मला परवानगी कशी नाकारू शकतात?' असा प्रश्‍नही गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

हवाई वाहतूक संघटनांनी गायकवाड यांना विमान प्रवास करू दिला जाणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कोणत्याही प्रकारची हिंसा सहन केली जाणार नाही, असे म्हणत 'या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल', असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. 'गायकवाड यांच्यासंदर्भातील प्रकरण संसदेच्या बाहेर घडले आहे. त्यामुळे आम्ही या घटनेची खात्री करून घेऊ आणि नंतर त्याप्रमाणे कारवाई करू' अशी माहिती लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दिली आहे.

गायकवाड हे गुरुवारी पुण्याहून दिल्लीला जात होते. त्यांचे बिझनेस क्‍लासचे तिकिट होते. मात्र त्यांना इकॉनॉमिक क्‍लासमध्ये बसण्यास सांगितले. यावरून त्यांची क्रू मेंबर सोबत वादावादी झाली. यानंतर गायकवाडयांनी कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली.


"#RavindraGaikwad' ट्रेण्डमध्ये
गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीबद्दल नेटिझन्स तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यामुळे आज ट्विटरवरील "टॉप 10' ट्रेण्डमध्ये #RavindraGaikwad हा ट्रेण्ड आढळून आला आहे. "कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही', असे म्हणत नेटिझन्सनी गायकवाड यांच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली आहे.

Web Title: Let the delhi police arrest me. I will not apologise : Gaikwad