सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे; नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना कानमंत्र; सरकारी यंत्रणा विकसित करणे गरजेचे
life of the common man should be bearable Narendra Modi Government system needs to developed
life of the common man should be bearable Narendra Modi Government system needs to developedsakal

नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्यांच्या जीवनात बदल व्हावा, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे हे शासनाचे पहिले ध्येय आहे. सामान्यांना सरकारशी व्यवहार करताना संघर्ष करावा लागू नये, त्यांना लाभ आणि सेवा कोणत्याही अडचणीशिवाय उपलब्ध व्हाव्यात. त्यांच्या स्वप्नांना संकल्पाच्या पातळीवर नेणे ही व्यवस्थेची जबाबदारी आहे. हा संकल्प सिद्धीकडे नेला पाहिजे आणि तेच आपल्या सर्वांचे ध्येय असले पाहिजे. स्वप्न ते संकल्प आणि संकल्प ते सिद्धी या प्रवासात आपण प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत असायला हवे,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कानमंत्र दिला.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागरी सेवा दिनानिमित्त आज विज्ञान भवन येथे सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा उपस्थित होते. मोदी यांनी अधिकाऱ्यांना चाकोरीबद्ध वाटेवरून न चालता चौकटीबाहेरचा विचार करण्याचे आवाहन केले. प्रशासनातील सुधारणा या प्रयोगशील, तसेच काळाच्या आणि देशाच्या गरजेनुसार असाव्यात असे त्यांनी सांगितले. आपण केवळ दबावाखाली बदलू नये, तर सक्रियपणे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. टंचाईच्या काळात उद्भवलेले आव्हानांवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपण भविष्याचा वेध वा अंदाज घेतला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

आजचे बदल आणि आधुनिकता स्वीकारण्याबरोबरच आपल्यात या प्राचीन शहाणपणाचे जतन करण्याची भावना देखील असली पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. याबरोबरच त्यांनी स्टार्ट-अप आणि शेतीमध्ये होत असलेल्या नवसंशोधनाची उदाहरणे दिली आणि प्रशासकांना त्यांना अनुकूल भूमिका घेण्यास सांगितले.

आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण तीन ध्येयांसाठी वचनबद्ध असले पाहिजे असे सांगताना पंतप्रधान म्हणाले, ‘भारताचे वाढते महत्व लक्षात घेता आपण काहीही करु ते जागतिक संदर्भात केले पाहिजे. आपण जागतिक स्तरावरील घडामोडींकडे सजगतेने पाहिले नाही, तर आपले प्राधान्यक्रम आणि ध्येय निश्चित करणे खूप कठीण होईल. हा दृष्टीकोन ठेवून आपण आपल्या योजना आणि सरकारी यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे.’

मोदी काय म्हणाले

  • जुन्या प्रशासकीय पद्धतीने आजच्या आव्हानांना सामोरे जाता येणार नाही

  • प्रशासकीय व्यवस्था नियमित वेगाने अद्ययावत होणे गरजेचे

  • अनावश्‍यक कायद्याच्या ओझ्याखालून व्यवस्थेला बाहेर काढा

  • नागरिकांचीही कायद्यांच्या जंजाळातून मुक्तता करा

  • देशाची एकता आणि अखंडता ही प्रमुख जबाबदारी

  • ‘राष्ट्र प्रथम, भारत प्रथम’ हेच ध्येय प्रत्येकाचे असले पाहिजे

स्वातंत्र्याचा अमृत काळ हा केवळ उत्सव साजरा करण्यासाठी किंवा भूतकाळाची स्तुती करण्यासाठी नाही. आता ७५ ते १०० वर्षांचा प्रवास हा नेहमीसारखा असू शकत नाही. या दरम्यानच्या २५ वर्षांच्या कालावधीकडे आपण पर्व म्हणून पाहिले पाहिजे आणि आतापासूनच आपली तशी दृष्टी असायला हवी. हा उत्सव ऐतिहासिक असावा. या भावनेने प्रत्येक जिल्ह्याने वाटचाल करावी. प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर सोडू नये.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com