पूर ओसरल्याने केरळमधील जनजीवन पूर्वपदावर ; शाळेची घंटा पुन्हा वाजू लागली

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

आम्ही पहिल्यांदाच एवढी मोठी आपत्ती पाहिली आहे. या आपत्तीचे परिणाम प्रत्यक्षात अनुभव आल्याने शाळेत येण्याची खूप भीती वाटत होती. 

- सवित, नववीतील विद्यार्थिनी 

तिरुवनंतपूरम : केरळमधील बहुतांशी भागातील पूर ओसरल्याने लोकांमधील भीतीही कमी होऊ लागली आहे. येथील जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. पुराच्या धसक्‍यामुळे बंद झालेल्या शाळांमधील घंटा आजपासून वाजू लागली आहे. शाळेत येणारे विद्यार्थी जेवणाच्या सुटीत तसेच शाळेच्या मैदानावर खेळतानाही पुराच्याच आठवणी काढत आहेत. 

तिरुवनंतपूरममधील "होली अँजल' शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेत पाय ठेवला, पण वर्गात जाण्याऐवजी मैदानावर गेल्या आणि हातात झाडू घेऊन शाळेचा परिसर स्वच्छ केला. महापुरामुळे गेल्या 10 ते 15 दिवस केरळमधील सुमारे पावणेचारशे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. महापुरात विशेषतः गावांमधील शाळांना जास्त फटका बसला. शाळांच्या इमारतींचे मोठे नुकसान झाल्याचे दिसले. वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील नुकसानीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे दिसून आले. 

तिरुवनंतपूरम शहरासह परिसराला पुराची फारशी झळ जाणवली नाही. मात्र, आजूबाजूच्या गावातील परिस्थितीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील होली अँजल ही शाळाही दहा दिवसांपासून बंद ठेवण्यात आली होती. इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत 3 हजार 600 विद्यार्थिनी शिकतात. 

शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. व्ही. गीता म्हणाल्या, ""नैसर्गिक आपत्ती ओढविल्याने व्यवस्थापनाने शाळा बंद ठेवली होती. पुरामुळे शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला होता. विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांनी सफाई केली.'' 
 

Web Title: Life time in Kerala due to flooding prevailed