'दिल्ली चलो मार्च' : शेतकऱ्यांच्या निश्चयापुढं सरकार नमलं; जाणून घ्या दिवसभरात काय काय घडलं?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अखेर दिल्ली प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अखेर दिल्ली प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला होता. मात्र, आता केंद्र सरकारने त्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. 'दिल्ली चलो मार्च'च्या अंतर्गत पंजाब आणि हरयाणाचे हजारो शेतकरी कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीकडे निघाले होते. 

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश घेऊ द्यावा तसेच त्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात असे आवाहन केंद्र सरकारला केले होते. अखेर या शेतकऱ्यांना प्रवेश मोकळा केल्यानंतर त्यांनी केंद्राचे आभार मानले आहेत.

या शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी म्हणून दिल्लीतील 'नाईन ग्राऊंड्स'ला तात्पुरता तुरुंग बनवण्यासाठीची परवानगी दिल्ली पोलिसांनी मागितली होती. मात्र दिल्ली सरकारने या शेतकऱ्यांनाच आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच लोकशाही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार या शेतकऱ्यांना आहे, त्यामुळे केंद्र सरकारने या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं म्हणत दिल्ली पोलिसांची ही मागणी धुडकावून लावली होती. 

काल सकाळपासून पंजाब-हरयाणा भागातील हे शेतकरी दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले आहेत. मात्र, त्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी हरयाणा-दिल्ली हायवेवर बॅरिकेड्स उभे केले. त्यांच्यावर तीव्र पाण्याचा फवारा तसेच अश्रूधूराचा वापर करुन शेतकऱ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे शेतकरी शेवटपर्यंत आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. 

काय आहेत मागण्या?

  •     शेतकरी विरोधी तीन अध्यादेश मागे घ्या
  •     स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट लागू करावा
  •     शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे
  •     शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले जावे
  •     शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळेची फी माफ केली जावी

 जाणून घेऊया या आंदोलनात आज दिवसभरात काय काय घडलं...

अपडेट्स :

दिल्लीतील बुरारी परिसरातील निरंकारी समागम मैदानावर निषेध करण्याची परवानगी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

 

- शेतकऱ्यांना आपल्या निषेधाच्या लोकशाही अधिकाराचा वापर करण्यासाठी दिल्लीमध्ये प्रवेश करण्याच्या केंद्राने दिलेल्या परवानगीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांनी आता शेतकरी कायद्यांबाबत शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने चर्चा करायला हवी आणि या पेटलेल्या प्रश्नाचे निराकरण करावे: पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह

- आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना राष्ट्रीय राजधानीत प्रवेश घेता येणार आहे. त्यांना बुरारी परिसरातील निरंकारी समागम मैदानावर निषेध करण्याची परवानगी असेल, अशी माहिती दिल्ली पोलिस आयुक्तांनी दिली आहे. तसेच कायद्याचे पालन करत शांततेत हे आंदोलन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

-  'नाईन स्टेडीयम' तात्पुरत्या स्वरुपात तुरुंग म्हणून वापरण्यासाठी दिल्ली पोलिसांनी दिल्ली सरकारकडे परवानगी मागितली होती. दिल्ली सरकारने ही परवानगी नाकारली आहे. 

- पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्लीच्या सीमेवरील तणावपूर्ण परिस्थिती कमी करण्यासाठी किसान संघटनांशी त्वरित चर्चा सुरू करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. 

- या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर महिलांचाही समावेश दिसून येतोय. दिल्लीकडे कूच करताना आंदोलकांना अडवलं जातंय. पण आंदोलक निषेधाच्या घोषणेसह सिरसा हायवेवर आंदोलन करत आहेत.

 

 

व्हिडीओ : सुरक्षारक्षकांकडून अश्रूधूराचा वापर सातत्याने करण्यात येतोय. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी कालपासून अश्रूधूर वापरण्यात येत आहे. हरयाणा दिल्ली बॉर्डरवर या धुराचे लोट दिसून येत आहेत. 

- व्हिडीओ :  चक्क आपल्या ट्रॅक्टरला दोरी बांधून बॅरिकेड म्हणून लावलेला ट्रक हटवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यापासून अडवण्यासाठी म्हणून बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. हा व्हिडीओ दिल्ली-बहादुरगढ हायवेवरील टिकरी बॉर्डरवरचा आहे. 

 

- शेतकरी संघटनांचा दावा आहे की आज संध्याकाळपर्यंत जवळपास 50 हजारहून अधिक शेतकरी दिल्ली बॉर्डरवर जमा होतील. 'नाईन स्टेडीयम' तात्पुरत्या स्वरुपात तुरुंग म्हणून वापरण्यासाठी दिल्ली पोलिसांनी दिल्ली सरकारकडे परवानगी मागितली आहे. आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था सांभळण्याचं काम करत आहोत, असं अंबाल्याच्या एसपी यांनी म्हटलं आहे. 

- किसान मजदूर संघर्ष कमिटीने दिल्ली चलो मार्चसाठी आवश्यक त्या सर्व लवाजम्यासह या आंदोलनाला सुरवात केलीय. पंजाब-हरयाणाच्या या शेतकऱ्यांना सध्या हरयाणा-दिल्लीच्या शिंघू बॉर्डरवर अडवण्यात आलं आहे. आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत आणि आम्ही ते करत राहू. आम्ही कृषी कायद्यांचा निषेध करत शांतपणे दिल्लीत प्रवेश करु. लोकशाहीमध्ये आम्हाला निषेध नोंदवण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आम्ही महिन्याभराचे अन्नधान्य आणि आवश्यक स्वयंपाकासाठीचे साहित्य भरुन घेऊन आलो आहोत. आणि आता आम्ही दिल्लीच्या दिशेने कूच करत आहोत, असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 
 

काय आहेत मागण्या?

  • शेतकरी विरोधी तीन अध्यादेश मागे घ्या
  • स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट लागू करावा
  • शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे
  • शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले जावे
  • शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळेची फी माफ केली जावी

- हरयाणा- दिल्ली बॉर्डरवर चक्का जाम झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Live Updates farmers protest in delhi chalo march against farms laws