राजीनामा देण्याची मनात इच्छा - अडवानी

गुरुवार, 15 डिसेंबर 2016

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आज संसदेत असते तर त्यांना दुःख झाले असते. या गोंधळात संसदेचा पराभव होत आहे. 

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ होत असल्याने कामकाज होत नाही. यामुळे मी खूप निराश झालो असून, राजीनामा देण्याची माझ्या मनात इच्छा असल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर हिवाळी अधिवेशनात एकही दिवस कामकाज होऊ शकलेले नाही. विरोधी पक्षांच्या खासदारांकडून मोदींनी सभागृहात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. तर, मोदींनी मला संसदेत बोलू दिले जात नाही, असे म्हटले आहे. अधिवेशनाच्या कालावधीतील एक दिवस शिल्लक असल्याने या अधिवेशनात कामकाज होणे अशक्य असल्याचे दिसत आहे.

अडवानी म्हणाले, की गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी माझे बोलणे झाले असून, त्यांनी लोकसभा अध्यक्षांना बोलावे आणि नोटाबंदीवर संसदेत चर्चा व्हावी. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आज संसदेत असते तर त्यांना दुःख झाले असते. या गोंधळात संसदेचा पराभव होत आहे.