लोकसभा प्रचारात संघाचे 11 लाख सक्रीय स्वयंसेवक 'दक्ष'

RSS Volunteers
RSS Volunteers

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तब्बल 11 लाख कार्यकर्त्यांनी देशातील साडेचार लाख गावांत जाऊन 'जास्तीत जास्त मतदान करा' असे आवाहन केले. दरम्यान 2019 च्या पहिल्या सहामाहीतच सुमारे 67 हजार लोकांनी, त्यातही चाळिशीखालील युवकांनी संघात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती संघाकडून देण्यात आली आहे. 

"संघ ही विशुध्द सांस्कृतिक संघटना असून आपला राजकारणाशी संबंध नाही," असे 1925 पासून वारंवार सांगणाऱ्या संघाने 'अबकी बार फिर मोदी सरकार' चे उद्दिष्ट भाजपसाठी आपण सक्रिय प्रचारही केला आणि करतोही याची कबुली पुन्हा दिल्याचे हे ढळढळीत उदाहरण मानले जाते. 

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे संघाच्या देशभरातील प्रांतप्रचारकांची बैठक नुकतीच पार पडली. झारखंडमधील तबरेज अन्सारी याची ठेचून हत्या करण्याची घटना ताजी असतानाच संघाने सामाजिक समरसतेचाही विडा उचलला आहे. ग्रामपरिवर्तन मोहीमेद्वारे 300 गावांत परिवर्तन घडविल्याचाही दावा या संघटनेने केला आहे. 

केंद्रात पुन्हा मोदीप्रणित भाजपला सत्ता मिळताच सत्तारूढ पक्षाच्या मातृसंस्थेनेही बाळसे धरल्याचे संघाच्या माहितीवरून दिसते. समाजात संघाबरोबर जोडले जाण्याची प्रचंड उत्सुकता असून सात दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरांत येणाऱ्या व संघाच्या संकेतस्थळावरून संघात येऊ इच्छिणाऱ्यांची संख्या लाखांच्या संख्येत वाढत असल्याचे संगाचे म्हणणे आहे.

2014 मध्ये मोदी प्रथम सत्तेवर आले, त्या वर्षात सदस्यांची संख्या 39 हजार 760 होती, ती 2019 मध्ये दुपटीने वाढून आतापावेतो सहा महिन्यांतच 66 हजार 835 लोकांनी संघात येण्याची इच्छा दाखविली आहे. मात्र संघात येण्यासाठी सदस्यत्व वगैरे अधिकृतरीत्या काही नसते. मग अशी विनंती केली की, तो स्वयंसेवक बनला ही पद्धती कशी रूढ करण्यात आली, याचे कोडे जाणकारांना उलगडलेले नाही. 

सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांच्या म्हणण्यानुसार, संघाची प्रकाशने देशातील पावणेदोन लाख गावांपर्यंत पोहोचली आहेत. यंदा 80 ठिकाणी झालेल्या संघशिक्षण वर्गांत 17 हजार 500 जणांनी सहभाग घेतला. आगामी काळात संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाने सामाजिक परिवर्तनासाठी सक्रिय व्हावे, यासाठी त्यांना प्रशिक्षण व जागरूकतेद्वारे प्रयत्नांची गती वाढविणार असल्याचेही संघ म्हणतो. 

जागृती की अदृश्‍य प्रचार ? 
लोकसभा निवडणुकीच्या काळात संघ स्वयंसेवकांनी देशातील साडेपाच लाखांपैकी साडेचार लाख गावात पोहोचून घरोघरी संपर्क केला व छोट्या बैठकाही घेतल्या. एक लाख महिलांसह 11 लाख स्वयंसेवकांनी संघाच्या भाषेतील 56 हजार 'मंडलां' पैकी 90 टक्के भाग व्यापला.

ही मोहीम मतदारांनी मतदान करावे या जागृतीसाठी असल्याचा संघाचा दावा असला, तरी पूर्व उत्तर प्रदेश व ग्रामीण पंजाबमधील अशाच बैठकांत राष्ट्रीय आणि प्रखर राष्ट्रवादी विचारांच्याच सरकारला (म्हणजे मोदींना) पुन्हा निवडून आणायचे आहे, असे भाजपचे नाव शिताफीने न घेता पण थेट आवाहन करण्यात आल्याचे 'सकाळ' च्या प्रतिनिधीने स्वतः पाहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com