मोदी लाटेवर अखेर राहूल गांधी स्वार !

गुरुवार, 14 जून 2018

भाजप मित्रपक्ष - संयुक्त जनता दल (जदयू), शिरोमणी अकाली दल, ऑल झारखंड स्टुडंट युनियन पार्टी, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी
काँग्रेस मित्रपक्ष - राष्ट्रीय जनता दल (राजद), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी), झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो), नागा पिपल्स फ्रंट
बसप मित्रपक्ष - राष्ट्रिय लोकदल, समाजवादी पार्टी (सप)

मोदी समर्थकांना धक्का बसेल, असे सर्वेक्षण प्रसिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता झपाट्याने ओसरत असून काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आता मोदी लाटेवर स्वार होऊन पुढे जात असल्याचे सर्वेक्षण 'द लोकनिती', 'सीएसडीएस' आणि 'एबीपी' यांनी प्रसिद्ध केले आहे. 'द क्विंट' या वेबसाईटवर या सर्वेक्षणाचे तपशील प्रसिद्ध झाले आहेत. 

लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहे. पंतप्रधान मोदी यांना राहूल यांचेच आव्हान येत्या लोकसभा निवडणुकीत असेल, असे सर्वेक्षणाचा सूर सांगतो आहे. आजच लोकसभा निवडणुका झाल्या, तर राहूल हे मोदींना धक्का देऊ शकतात, असे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. 

काय आहे सर्वेक्षणात?

 • मोदी सरकारची लोकप्रियता कमी झाली आहे. 2013 मध्ये निवडणुकीच्या नऊ महिने आधी युपीए सरकारची लोकप्रियताही अशाच प्रकारे कमी झाली होती. आज 47 टक्के लोकांना भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येणे नको आहे. 
 • अल्पसंख्यांक असलेला मुस्लिम, ख्रिश्चन आणि शिख समाज सरकारविरोधात गेला आहे. बहुसंख्यांक असलेल्या हिंदु समाजाची मते विभागली गेली असल्याचा फटका मोदी सरकारला बसेल.
 • राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसला चार मतांपैकी एक (25 टक्के) या प्रमाणात मते मिळतील. यूपीए संपूर्ण देशभरात 31 टक्के मते मिळवेल.
 • या व्यतिरिक्त काँग्रसचे मित्रपक्ष, मायावती यांचा बहुजन समाज पार्टी (बसप), अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्षाचे (सप) आणि एच. डी. देवेगौडा यांच्या धर्ननिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) यांच्या आणखी 11 टक्के मतांचा काँग्रेसला फायदा होईल.
 • मतदारांचा पाठिंबा आणि मतदारांमध्ये लोकप्रियता अशा दोन वेगवेगळ्या निकषांवर मोदी आणि राहूल यांची तुलना केली आहे. 
 • मतदारांच्या पाठिंब्यामध्ये मोदी राहूल गांधी यांच्यापेक्षा 17 टक्क्यांनी आज पुढे असले, तरी मोदी यांचा पाठिंबा दहा टक्क्यांनी घसरेल.
 • मतदारांमधील लोकप्रियतेमध्ये मोदी आणि राहूल यांना समसमान 43 टक्के लोकांची पसंती आहे. मात्र, फक्त वाढीचाच विचार केला, तर राहूल गांधी यांची लोकप्रियता वाढली आहे. 
 • राहुल गांधी यांनी आपली प्रतिमा सुधारली आहे, असे तब्बल 30 ट्क्के लोकांना वाटते. त्याचवेळी मोदींनी लोकप्रियता गमावल्याचे 35 ट्क्के लोकांना वाटते. 
 • राहुल गांधींची लोकप्रियता मध्यमवयीन किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील मतदारांमध्ये आहे. मोदींची लोकप्रियता असणारा वयोगट मात्र लहान आहे. 
 • लहान गावांमध्ये काँग्रेसची प्रतिमा उंचावली असून, शहरांमध्ये याची सुरुवात झाली असल्याचे चित्र आहे.
 • अहवालानुसार 60 टक्के लोकांच्या मते मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे तर 50 टक्के लोकांमध्ये नीरव मोदी प्रकरणामुळे सरकारबद्दल नाराजी आहे. त्यापैकी दोन तृतियांश लोक मोदी सरकारनी घेतलेल्या किंवा न घेतलेल्या निर्णयांवर समाधानी नसल्याचे चित्र आहे.
 • दलित आणि आदिवासी समाजामध्ये देखील काँग्रेसने आपली प्रतिमा सुधारली आहे.
 • शेतकऱ्यांमध्ये देखील मोदी सरकारबद्दल तीव्र नाराजी आहे. एका वर्षामध्ये यामध्ये 12 टक्के एवढी घट झाली आहे. हे शेतकरी स्थानिक पक्षांना प्राधान्य देतील.
 • उत्तर भारत वगळता दक्षिण, पश्चिम आणि मध्य भारतात मोदी लाट वेगाने ओसरत असल्याचे चित्र आहे.
 • जीएसटी (गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स) लागू केल्याबद्दलही सर्वत्र नाराजीचा सूर आहे. जानेवारी ते मे महिन्यादरम्यान जीएसटीची लोकप्रियता 40 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.
 • सध्या असा एकही मुद्दा नाही ज्याबाबत मोदी सरकारबद्दल लोकांच्या मनात सकारात्मक भूमिका राहील.

2019 चे चित्र

 • मोदी भक्त सोडले तर इतर मतदारांच्या नजरते राहूल गांधी आपली प्रतिमा सुधारण्यात यशस्वी होतील.
 • तर मोदींना मात्र पुन्हा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. त्यासाठी ते कोणता मुद्दा समोर घेऊन येतील यावर निवडणूकीचा निकाल ठरेल. 

भाजप मित्रपक्ष - संयुक्त जनता दल (जदयू), शिरोमणी अकाली दल, ऑल झारखंड स्टुडंट युनियन पार्टी, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी

काँग्रेस मित्रपक्ष - राष्ट्रीय जनता दल (राजद), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी), झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो), नागा पिपल्स फ्रंट

बसप मित्रपक्ष - राष्ट्रिय लोकदल, समाजवादी पार्टी (सप)

Web Title: Lokniti-CSDS-ABP Mood of the Nation Survey Rahul Gandhi closing to Narendra Modi