Election Results : कर्नाटकात ढिसाळ क्षेत्ररक्षण भाजपच्या पथ्यावर

Election Results : कर्नाटकात ढिसाळ क्षेत्ररक्षण भाजपच्या पथ्यावर

काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत लाथाळ्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या एकाच घरातून तिघांची उमेदवारी, माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा फाजील आत्मविश्‍वास याला कर्नाटकी जनतेने जोरदार तडाखा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास दाखवत २०१४ च्या निवडणुकांपेक्षा जास्त जागा निवडून देऊन राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस आघाडीला जमिनीवर आणले.
राज्यात काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार स्थापन झाले तेच मुळात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष असूनही काँग्रेस-जेडीएस आघाडीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली.

सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि काँग्रेसचे सिद्धरामय्या परस्परांवर सातत्याने शरसंधान करत राहिले. गेल्या वर्षभरात हे सरकार परस्परांतील हेवेदावे यामध्येच गुंतून पडलेले दिसून आले. त्यामुळे राज्यातील विकासकामांना कोठेही फारसा हातच लागला नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अशातच हाती आलेली सत्ता गेल्यामुळे दुखावलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने कर्नाटकात कमळ फुलवायचेच यासाठी खूणगाठ बांधली. त्याचा पहिला टप्पा म्हणून या निकालांकडे पाहता येईल. आघाडीतील नाराजांना हाताशी धरून भाजपने येथे लोकसभेत मोठा विजय मिळविला.

गुलबर्ग्यात काँग्रेसचे आमदार उमेश जाधव यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून खर्गे यांना पराभूत केले. खर्गे यांच्याबरोबरच वीरप्पा मोईली, के. एच. मुनिअप्पा या काँग्रेसच्या दिग्गजांना तसेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना पराभवाचा धक्का बसला. देवेगौडांच्या घराणेशाहीला मतदारांनी सणसणीत चपराक दिली. कुमारस्वामी यांचा पुत्र निखिल याला पराभव पत्करावा लागला.

सीमाभागातही भाजपने आपला करिष्मा दाखवला आहे. या निकालाचा राज्यातील सरकारवर नक्कीच परिणाम होणार असून, आता ‘ऑपरेशन कमळ’साठी सुरू असलेल्या हालचाली गतिमान होतील. लोकसभेमध्ये बळ वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com