Election Results : बेळगाव जिल्ह्यात तीनही जागेवर फुलले कमळ

Election Results : बेळगाव जिल्ह्यात तीनही जागेवर फुलले कमळ

बेळगाव - मोदी फिव्हरमुळे जिल्ह्यात यंदा पूर्ण कमळ खुलले. काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वाद, मतदारांमधील नाराजी यांचा प्रभाव, केंद्रातील सत्तेत पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पाहण्याची मतदारराजाची इच्छा यामुळे बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार तिन्ही लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवारांनी विजय खेचत काँग्रेसला मोठा धक्का दिला. 

सुरेश अंगडी चाैथ्यांदा विजयी

बेळगाव लोकसभा मतदार संघात खासदार सुरेश अंगडी यांनी चौथ्यांदा विजय साधला. लकी खासदार म्हणून पुन्हा एकदा ते ओळखले जात आहेत. यापूर्वी 2004 साली अटल बिहारी वाजपेयी, 2009 मध्ये बी. एस. येडीयुराप्पा यांची हवा आणि नंतर 2014 आणि 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट यामुळे सलग चार वेळा ते बेळगाव लोकसभेवर निवडून आले. मतदार संघातील जनसंपर्क त्यांनी राखला नसल्याने अखेर निवडणुक प्रचारात त्यांनी स्वतः आपल्याकडे नव्हे; मोदींना सत्तेवर आणा, असे आवाहन केले होते. काँग्रेसकडून तगडा उमेदवार बेळगावसाठी लाभला नाही. त्यातच माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी गोकाकमध्ये भाजपच्या बाजूने मांडलेले मत आणि त्यांची होणारी भाजपवारी याचा परिणाम एकुणच निकालावर जाणवला. मागील लोकसभा निवडणुकीत बेळगाव दक्षिणमध्ये भाजपने अधिक मते मिळविल्याने वनमंत्री सतिश जारकीहोळी यांनी दक्षिणवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे इतर मतदार संघात काँग्रेसचे दुर्लक्ष झाले. ग्रामीण भागात प्रचार झाला नाही. याचाही फायदा भाजपला झाला. 

चिक्कोडीत अण्णासाहेब जोल्ले विजयी

चिक्कोडी लोकसभा मतदार संघात मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी भाजप उमेदवार रमेश कत्ती यांचा केवळ चार हजार मताधिक्‍यांनी पराभव केला होता. त्यामुळे यंदा भाजपने कत्ती यांना उमेदवारी नाकारत उद्योगपती अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी देऊ केली. याचा पुरेपूर लाभ भाजपला झाला. तब्बल एक लाख मताधिक्‍यांनी जोल्ले यांनी बाजी मारली. मागील विधानसभा निवडणुकीत जोल्ले यांना चिक्कोडी मतदार संघात पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. तर त्यांची पत्नी शशिकला जोल्ले यांनी निपाणी मतदार संघातून विजय मिळविला होता. यंदा भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर करताच कत्ती बंधूंनी आपला असंतोष जाहीर केला होता. रमेश कत्ती यांचे बंधू उमेश कत्ती यांनी पक्षत्याग करण्याचेही जाहीर केले होते. अखेर कत्ती बंधूंची नाराजी दूर करण्यात पक्षाचे नेते यशस्वी ठरल्याने विजयाचा मार्ग सोपा झाला. 

कारवारमध्ये अनंतकुमार हेगडे विजयी

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर आणि कित्तूर हे दोन मतदार संघ कारवार लोकसभा मतदार संघात येतात. या दोन्ही मतदार संघामध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यांचा प्रचार, मोदी आणि विद्यमान खासदार तसेच भाजपचे उमेदवार अनंतकुमार हेगडे यांची लोकप्रियता यामुळे भाजपचा विजय यापूर्वीच निश्‍चित झाला होता. केवळ मतदारांकडून त्यावर मतदानाद्वारे शिक्कामोर्तब होणे शिल्लक होते. ठरल्याप्रमाणे मतदारांनी आपला कौल भाजपच्या बाजूने दिला. सलग सहाव्यांदा ते लोकसभेवर निवडून आले आहेत. कारवार जिल्ह्यावर काँग्रेस नेते मंत्री आर. व्ही. देशपांडे यांचा पगडा आहे. यंदा धजद - काँग्रेस युतीचे उमेदवार म्हणून आनंद असनोटीकर रिंगणात होते. मात्र त्यांचा पराभवाचा जबर झटका सहन करावा लागला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com