Loksabha 2019 : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरवात

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 एप्रिल 2019

2014 मध्ये या 91 पैकी सर्वाधिक 49 जागांवर कॉंग्रेस व भाजप यांच्याशिवाय इतर उमेदवार निवडून आले होते. भाजप आघाडीला 35 जागा मिळाल्या, तरी त्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश व विदर्भ यांचा वाटा लक्षणीय होता. यंदा चंद्राबाबू नायडू भाजपसोबत नाहीत व पश्‍चिम उत्तर प्रदेश-विदर्भातही भाजप-शिवसेना युतीला त्या यशाची पुनरावृत्ती करणे अतिशय बिकट मानले जाते.

नवी दिल्ली : परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह, गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह अनेक हायप्रोफाईल दिग्गजांचे भवितव्य पुढच्या 24 तासांमध्ये मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (गुरुवार) ज्या 20 राज्यांतील 91 जागांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे. त्यात महाराष्ट्र, पश्‍चिम उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेशातील प्रतिष्ठित जागांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश विधानसभेच्या 175, सिक्कीमच्या 32 आणि ओडिशा विधानसभेच्या 28 जागांसाठीही आज मतदान होत आहे. 

पहिल्या टप्प्यात भाजपच्या जागा 2014 पेक्षा वाढलेल्या दिसतील, असे भाकीत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी "सकाळ'शी बोलताना वर्तविले. ते म्हणाले, की ज्या जागा भाजपकडे होत्या त्या तर मिळतीलच; पण नव्या जागांवरही भाजपला मोठा विजय मिळेल. पहिल्याच टप्प्याच्या मतदानातून "गुन्हेगारी गठबंधना'ला (महाआघाडी) मतदार सणसणीत उत्तर देतील, असाही दावा त्यांनी केला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर, बागपत, कैराना, नोएडा, गौतमबुद्धनगर, गाझियाबाद आदी जागा भाजप पुन्हा राखेल, असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

उत्तर प्रदेशाच्या मुझफ्फरनगर मतदारसंघात रालोदचे प्रमुख अजितसिंह यांचा सामना भाजपचे संजीव बलियान यांच्याबरोबर, बागपतमध्ये अजितसिंह यांचा मुलगा जयंत चौधरी यांचा सामना केंद्रीय मंत्री सत्यपाल मलिक यांच्याबरोबर आहे. 

2014 मध्ये या 91 पैकी सर्वाधिक 49 जागांवर कॉंग्रेस व भाजप यांच्याशिवाय इतर उमेदवार निवडून आले होते. भाजप आघाडीला 35 जागा मिळाल्या, तरी त्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश व विदर्भ यांचा वाटा लक्षणीय होता. यंदा चंद्राबाबू नायडू भाजपसोबत नाहीत व पश्‍चिम उत्तर प्रदेश-विदर्भातही भाजप-शिवसेना युतीला त्या यशाची पुनरावृत्ती करणे अतिशय बिकट मानले जाते. यूपीएला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. त्या वेळी 15 जागा जिंकणारे चंद्राबाबू आता कॉंग्रेसबरोबर आहेत, ही बाब 2014 च्या तुलनेत कॉंग्रेस व भाजप यांच्या जागांची यंदा अदबलाबदल होण्याचे द्योतक मानले जाते. आंध्रात सर्व 25, तेलंगणमध्ये 17 व उत्तराखंडमधील साऱ्या पाच जागांवर उद्या एकाच टप्प्यात निवडणूक मतदान होत आहे. बिहारच्या जमुई मतदारसंघात लोजप नेते चिराग पासवान यांची लढत रालोसपचे भूदेव चौधरी यांच्याबरोबर आहे. अरुणाचल प्रदेशाच्या अरुणाचल पश्‍चिम मतदारसंघात केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू रिंगणात आहेत, तर आसामच्या कालियाबोरमध्ये माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव उभा आहे. 

पहिल्या टप्प्यात... 

20 
राज्ये 

91 
मतदारसंघ 

07 
महाराष्ट्रातील मतदारसंघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Elections Begins 91 Seats Vote In First Phase