नव्या लोकसभेचे सहा जूनपासून अधिवेशन; पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत चमकदार निर्णयाची शक्‍यता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 मे 2019

दणदणीत बहुमताने पुन्हा सत्तारूढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील सतराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन येत्या 6 ते 15 जूनदरम्यान होणार आहे.

नवी दिल्ली : दणदणीत बहुमताने पुन्हा सत्तारूढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील सतराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन येत्या 6 ते 15 जूनदरम्यान होणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होणाऱ्या या अधिवेशनात नव्या सभापतींची निवड होईल. तोवर हंगामी सभापतीपद सर्वांत ज्येष्ठ सदस्य असलेले संतोषकुमार गंगवार यांच्याकडे दिले जाऊ शकते. 

दरम्यान, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाबाबत जोरदार चर्चा रंगल्या आहेत. गुजरातचा पूर्वेतिहास पाहता ते आधीच्या नावांपैकी 45 ते 50 टक्के नावेच कायम ठेवतात व मंत्रिमंडळात 50 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देतात. त्या अनुषंगाने मीनाक्षी लेखी, प्रवेश वर्मा, वरुण गांधी, शाहनवाज हुसेन हे भाजपचे तर पवन वर्मा (संयुक्त जनता दल) तसेच अनिल देसाई किंवा अरविंद सावंत हे सेनेचे नवे चेहरे दिसू शकतात. एका दरबारी नेत्याने जोर लावला, तर वर्मा यांच्याऐवजी गौतम गंभीर यांनाही लॉटरी लागू शकते. दुसरीकडे अमित शहा मंत्रिमंडळात येणार असतील, तर भाजप अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव किंवा जे. पी. नड्डा यांच्या नावाचीही चर्चा आहे. 

लोकसभेचे पहिले अधिवेशन नऊ दिवसांचे आहे. अपेक्षेनुसार पाच जूनला ईदचे चंद्रदर्शन न झाल्यास या तारखांत किरकोळ फेरफार होऊ शकतो. 30 तारखेच्या शपथविधीनंतर मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक 31 मे रोजी होईल. तीत अधिवेशनाची रूपरेषा ठरविणे व एखादा चमकदार निर्णयही मोदी घेण्याची चिन्हे आहेत. 

उपाध्यक्षपदासाठी माहताब यांना पसंती? 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होईल. साधारणतः दहा जूनला नव्या अध्यक्षांची निवड होईल. उपाध्यक्षपदासाठी बिजू जनता दलाचे अभ्यासू खासदार भर्तृहरी माहताब यांच्या नावास मोदी पसंती देतील, अशी चर्चा आहे. राज्यसभेत सरकारला अजूनही बहुमत नाही. अमित शहा लोकसभेवर निवडून गेले आहेत व सभागृहनेते अरुण जेटली आजारी आहेत. त्यामुळे वरिष्ठ सभागृहात जे. पी. नड्डा वा प्रकाश जावडेकर यांना महत्त्वाचे पद मिळू शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Sessions will be starts from 6 June