लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढविणार ः राऊत

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

लोकसभेच्या निवडणुकीची तयारी देशभरात जोरात सुरू आहे, त्याच पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने गोव्यातही गेल्या तीन दिवसांपासून पक्षबांधणीचे काम सुरू केले, ते संपत आले आहे. दोन्ही जागा लढविण्यासाठी ठाकरे यांनी संमती दिली आहे. हल्लीच गोवा सुरक्षा मंचचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली, त्यात त्यांनी पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे

पणजी - आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा शिवसेना स्वतंत्रपणे गोवा सुरक्षा मंचच्या पाठिंब्याने लढविणार आहे. गोवा सुरक्षा मंच पक्षाशी असलेली युती कायम राहणार आहे. विधानसभा निवडणुकीबाबत दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गोव्यात येणार असून, त्या वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर व पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका होणार असल्याची माहिती खासदार व गोवा शिवसेना प्रभारी संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

लोकसभेच्या निवडणुकीची तयारी देशभरात जोरात सुरू आहे, त्याच पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने गोव्यातही गेल्या तीन दिवसांपासून पक्षबांधणीचे काम सुरू केले, ते संपत आले आहे. दोन्ही जागा लढविण्यासाठी ठाकरे यांनी संमती दिली आहे. हल्लीच गोवा सुरक्षा मंचचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली, त्यात त्यांनी पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. शिवसेनेची पक्षबांधणी सुरूच असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रमुख तालुक्‍यांत पक्षाची कार्यालये सुरू झाली आहेत व शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे गोव्यात येतील तेव्हा आणखी काही कार्यालये सुरू केली जातील, असे राऊत यांनी सांगितले.
गोव्यातील लोकांच्या ज्या भावना असतील त्याबरोबर शिवसेना नेहमीच उभी राहणार आहे, असे उत्तर राऊत यांनी राज्यातील डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला वाद व गोव्यातील शिवसेनेच्या सिक्वेरा यांच्या पुतळ्याबाबतच्या भूमिकेवर दिले.

लोकसभेत जर कोणी युतीचा हात पुढे केला तर आवश्‍यक घेऊ, मात्र उमेदवार हे शिवसेनेचे असतील. पक्षाकडे स्वतःचे उमेदवार असून त्यासाठी उमेदवार आयात करण्याची शक्‍यता त्यांनी फेटाळून लावली.

Web Title: loksabha shiv sena goa