अमित शहांचा पॅटर्न चालणार?

अमित शहांचा पॅटर्न चालणार?

२००९ नंतर सतत अपयशाला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसपुढे निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. २००९ मध्ये झालेल्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये पाचही जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली होती. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विधानसभेच्या सत्तरपैकी ५७ जागांवर आपला झेंडा फडकावला होता. विधानसभा आणि लोकसभेमधला विजय, सत्तेमध्ये असताना केलेली कामे आणि सर्वसामान्यांपर्यंत पोचवलेल्या अनेक योजना, यामुळे भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत सत्तेपर्यंत जाण्यासाठी रस्ता अनुकूल दिसतोय. याउलट २०१४ पासून ते २०१९ पर्यंतच्या सत्तेच्या कालखंडात भाजपने फक्त घोषणांचा पाऊसच पाडलाय, प्रत्यक्षात लोकांची कामं झालीच नाहीत, अशी ओरड काँग्रेसच्या गोटामधून होत आहे. २००९ मध्ये आम्ही सत्ता मिळवली होती आणि आता २०१९ मध्ये त्याची पुनरावृत्ती होईल, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. काँग्रेसने उत्तराखंडमध्ये असलेला आपला चेहरा हरीश रावत यांच्या खांद्यावर पक्षाचा झेंडा दिल्याचे सांगण्यात येते. यातूनच काँग्रेसने अवघा उत्तराखंड पिंजून काढला आहे. हरीश रावत नेहमीच चर्चेचा विषय झालेले आहेत. त्यामुळे कधी कधी पक्षासाठी ते डोकेदुखी असतात. अमित शहा यांनी भाजपची सत्ता येथे कायम राहावी, यासाठी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे.

भाजपचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि भाजपशी संबंधित नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या कार्यकर्त्यांची फळी यानिमित्ताने सक्रिय झाली आहे. काँग्रेसची अंतर्गत बंडाळी येथे दिवसेंदिवस फोफावत आहे. त्याचा फटका काँग्रेसला बसतोच आहे. किशोर उपाध्ये हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनीही पक्षात आपली वेगळी चूल मांडलेली आहे. रावत यांच्या बंडाचा झेडा या वेळी कायम राहील काय, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीत सरळ सरळ लढत आहे. या स्पर्धेत बहुजन समाज पक्ष आणि उत्तराखंड क्रांती दल म्हणावे तेवढे बलशाली नाहीत.

उत्तराखंड क्रांती दलाची हवा पूर्वीसारखी राहिलेली नाही. स्थानिक प्रश्नावर लढून लोकांची मने जिंकणे, अशी ओळख उत्तराखंड क्रांती दलाची होती; पण ती आता राहिलेली नाही. राज्याचे राजकारण हे नेहमी उच्च जातीच्या भोवताली फिरताना पाहायला मिळतंय. राज्यात हिंदू मतदारांची संख्या ८३ टक्के, बाकी मते मुस्लिम आणि दलित समाजाची आहेत. उद्योग, सेवा व्यवसाय हे राज्यातील प्रभावी घटक असले, तरी बेकारांची संख्या दिवसेंदिवस वाढते, हे तेवढंच खरं आहे. राजकारणातील प्रमुख मुद्दे हे बेकारी, भ्रष्टाचार, सरकारचे चुकीचे धोरण आणि त्यापलीकडे जाऊन पक्षांतर्गत असलेले वाद हे आहेत. 

नारायण दत्त तिवारी, विजय बहुगुणा यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांची नावे काँग्रेसमध्ये आहेत, तरीही काँग्रेसला यश का येत नाही? त्याचे कारण अमित शहांचे निवडणूक व्यवस्थापन पॅटर्नमध्ये दडले आहे. मागच्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांत या पॅटर्नने भाजपचा झेंडा उत्तराखंडावर फडकवला होता. आता भविष्यातही त्याची पुनरावृत्ती होईल काय, हे पाहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com