केरळमध्ये आज लाँग मार्च; शबरीमाला मंदिरप्रवेश वाद

Long march in Kerala today for Shabarrmala temple entrance
Long march in Kerala today for Shabarrmala temple entrance

तिरुअनंतपुरम : शबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध केरळ सरकारने याचिका दाखल करावी, या मागणीसाठी उद्या (ता. 15) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली सुमारे 80 हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई हे लॉंग मार्चचे नेतृत्व करणार आहेत. धार्मिक परंपरा आणि रुढी जपण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती करावी, अशीही मागणी प्रदेश भाजपने केली आहे. 

अय्यपा ब्रह्मचारी असून, दहा ते 50 वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सर्व वयोगटांतील महिलांना दर्शनासाठी परवानगी देणारा आदेश दिला आहे. या आदेशाविरुद्ध याचिका दाखल करण्यास केरळ सरकार आणि देवासम मंडळाने नकार दिला आहे. येत्या 18 ऑक्‍टोबरपासून मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. तत्पूर्वी मंदिर 17 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी सुरू होणार आहे. शबरीमला येथे दर्शनासाठी महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई जाणार असून, स्थानिक शिवसेनेने मात्र आत्मघाती पथक रवाना करणार असल्याचे नमूद केले. केरळ सरकारने मात्र शबरीमला येथील महिलांच्या दर्शनासाठी तयारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्य पोलिसांना निर्देश दिले असून, मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

दरम्यान, या आदेशाविरुद्ध राज्यभरात ठिकठिकाणी धरणे, मोर्चा आंदोलन करण्यात येत आहे. प्रारंभी भाजपने महिलांच्या मंदिरप्रवेशाची बाजू घेतली होती; परंतु भाविकांची नाराजी पाहता भाजपने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारचा लॉंग मार्च पंडलम येथून सुरू होणार असून, तो सचिवालयापर्यंत जाणार आहे. हिंदू भाविकांच्या तीव्र भावना लक्षात घेता सीपीएमच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना तडजोडीची भूमिका घेण्याचे सागितले आहे. यासाठी मंगळवारी पंडलम येथील शाही कुटुंबीयासमवेत चर्चा होणार आहे. यादरम्यान लॉंग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवीण तोगडिया यांचे आज आगमन झाले आणि शबरीमाला मंदिराच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने अध्यादेश आणावा, अशी मागणी केली. भाजप पक्ष दुटप्पी भूमिका घेत असल्याचाही आरोप त्यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com