'या' बँकेला झालाय 5763 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा!

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

आयडीबीआय बॅंकेने ऑक्टोबर 2019 मध्ये प्रेफरेन्शियल पद्धतीने भारत सरकार आणि एलआयसीला 9,300 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर विकले होते.

मुंबई : आयडीबीआय बॅंकेने डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 5,763.04 कोटी रुपयांच्या निव्वळ तोट्याची नोंद केली आहे. विविध तरतूदींमध्ये करण्यात आलेली वाढ आणि बॅंकेच्या मालमत्तेच्या दर्जातील घसरण यामुळे बॅंकेच्या तोट्यात वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयडीबीआय बॅंकेत भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) मालकी हिस्सा आहे. सध्या बॅंकेचा समावेश रिझर्व्ह बॅंकेच्या प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (पीसीए) आराखड्यात आहे. मागील वर्षी याच कालावधीत बॅंकेने 4,185.48 कोटी रुपयांच्या निव्वळ तोट्याची नोंद केली होती. तर सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत बॅंकेला 3,458.84 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

- 'या' आहेत सर्वाधिक तोट्यातील सरकारी कंपन्या; तर यांनी कमावला सर्वाधिक नफा

आयडीबीआय बॅंक आर्थिक संकटात सापडल्यामुळे एलआयसीने बॅंकेत भांडवल ओतले होते. ऑक्टोबर ते डिसेंबर 2019 या कालावधीत बॅंकेने विविध कर, तरतूदींसाठी 6,273 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तिसऱ्या तिमाहीत बॅंकेने कमी करदरातील एकदाच कर भरण्याच्या सुविधेचा लाभ घेतल्याने बॅंकेवर 6,273 कोटी रुपयांचा बोझा वाढला आहे. करासाठीची तरतूद वगळल्यास बॅंकेने 5,763 कोटी रुपयांच्या तोट्याऐवजी 418 कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली असती, अशी माहिती बॅंकेने दिली आहे.

- INDvsNZ : ३१ वर्षांनंतर टीम इंडियावर आली 'अशी' वेळ!
 
निव्वळ व्याजातून बॅंकेला मिळणाऱ्या उत्पन्नात 13 टक्क्यांची वाढ होत ते 1,357 कोटी रुपयांवरून 1,532 कोटी रुपयांवर पोचले आहे. तर बॅंकेचे निव्वळ व्याजासाठीचे मार्जिनसुद्धा 39 बेसिस पॉईंटने वाढून 1.88 टक्क्यांवरून 2.27 टक्क्यांवर पोचले आहे. बॅंकेचा कार्यान्वित नफा 76 टक्क्यांनी वाढून 725 कोटी रुपयांवरून 1,278 कोटी रुपयांवर पोचला आहे.

- खूशखबर ! या कंपनीत आहे २० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती

डिसेंबरअखेर बॅंकेच्या एकूण उत्पन्नात किंचित वाढ होत ते 6,190.94 कोटी रुपयांवरून 6,215.60 कोटी रुपयांवर पोचले आहे. बॅंकेचा प्रॉव्हिझन कव्हरेज रेशो 92.41 टक्के इतका आहे.
बॅंकेच्या एकूण थकित कर्जाचे प्रमाण 29.67 टक्क्यांवरून 28.72 टक्क्यांवर आले आहे. तर निव्वळ थकित कर्जाचे गुणोत्तर 14.01 टक्क्यांवरून घटून 5.25 टक्क्यांवर आले आहे.

आयडीबीआय बॅंकेने ऑक्टोबर 2019 मध्ये प्रेफरेन्शियल पद्धतीने भारत सरकार आणि एलआयसीला 9,300 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर विकले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss widens to Rs 5763 crore with asset quality declined to IDBI Bank