कमळ प्रदेश... मोदींना सर्वमान्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 मार्च 2017

 • 14 वर्षांच्या "वनवासा'नंतर यूपीत भाजपला तीन चतुर्थांश बहुमत
 • उत्तराखंडातही तीन चतुर्थांश बहुमतासह पुनरागमन
 • पंजाबमध्ये विजयामुळे कॉंग्रेसला संजीवनी; मणिपूर, गोव्यात सर्वांत मोठा पक्ष

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सर्वमान्य नेते आहेत, यावर आज विधानसभा निकालांनी शिक्कामोर्तब केले. सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर प्रदेशात सत्तेचा चौदा वर्षांचा 'राजकीय वनवास' संपवत तीन चतुर्थांश बहुमत मिळवत भाजपने दणदणीत पुनरागमन केले.

'कॉंग्रेसमुक्त भारता'च्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकत उत्तराखंडात दणदणीत विजय मिळवत कॉंग्रेसला सत्तेवरून हटविले; मात्र लोकसभा निवडणुकीपासून गलितगात्र झालेल्या कॉंग्रेसला पंजाबातील स्पष्ट बहुमतामुळे थोडी संजीवनी लाभली आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये त्रिशंकू स्थिती असली, तरी या दोन्ही राज्यांत सर्वाधिक जागा मिळालेल्या कॉंग्रेसच्या सत्तास्थापनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भाजप आणि कॉंग्रेसला आपणच पर्याय असल्याचे ढोल बडवणाऱ्या आम आदमी पक्षाला (आप) मतदारांनी फटका दिला आहे. पंजाबात दुसरा क्रमांक मिळालेल्या या पक्षाला गोव्यात खातेही उघडता आले नाही. एकंदर चित्र पाहता मतदारांचा कौल परिवर्तनालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यापुढे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मर्यादा पुन्हा उघड झाल्या असून, उत्तर प्रदेशात यंदा सत्तारूढ समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करूनही कॉंग्रेसच्या पदरी दारुण अपयशच पडले आहे. 2012 मध्ये उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या, तर या वेळी त्यांना अवघ्या सात जागा मिळाल्या.

अपक्षांचा मतांचा टक्का घसरला 

 • उत्तर प्रदेश : 2.6 (2017), 4.13 (2012) 
 • पंजाब : 2.1 (2017 ), 6.75 (2012) 
 • उत्तराखंड : 10 (2017), 12.3 (2012) 
 • गोवा : 11.1 (2017), 16.6 (2012) 
 • मणिपूर : 5.2 (2017), 5.2 (2012) 

कॉंग्रेसवर अफाट विश्‍वास दाखवून पाठिंबा दिलेल्या पंजाबमधील प्रत्येकाचे मी आभार मानतो. पंजाब आणि तेथील युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा एक जनादेशच आहे. न थकता काम करणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंग आणि आमच्या सर्व पक्ष कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. 
- राहुल गांधी, कॉंग्रेस उपाध्यक्ष 

मतदान यंत्रांमध्ये केलेल्या गडबडीमुळे भाजपला हे यश मिळाले. इतर पक्षांची मतेही आपसूक त्यांना मिळाली. ही गोष्ट पचवणे अवघड असून, हिम्मत असेल तर भाजपने पुन्हा निवडणूक घ्यावी. त्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. 
- मायावती, बसप प्रमुख 

पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत खूप परिश्रम घेतले. मात्र जनतेने दिलेला निर्णय आपण स्वीकारला असून, आपली लढाई यापुढेही नेटाने सुरू राहील. 
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली 

जनतेने आपल्या एक्‍स्प्रेसपेक्षा बुलेट ट्रेनला पाठिंबा दर्शविला. हे वास्तव आपण स्वीकारले असून, यापुढेही कॉंग्रेस सोबतची आघाडी कायम राहील. नवीन सरकारला आपल्या शुभेच्छा. 
अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश 

 • मुलायमसिंह यांची सून अपर्णा यादव लखनौ कॅंटोन्मेंटमधून पराभूत; रिटा बहुगुणा विजयी 
 • अमेठीत कॉंग्रेसला धक्का ः चारपैकी तीन जागा भाजपला, एक समाजवादी पक्षाला 
 • उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत दोन्ही मतदारसंघांत पराभूत (हरिद्वार आणि किच्चा) 
 • गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पराभूत 
 • पंजाबात लांबी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल विजयी, कॅ. अमरिंदरसिंग पराभूत 
 • मात्र, पतियाळातून कॅ. अमरिंदरसिंग विजयी; सुखबीरसिंग बादल जलालाबादमधून विजयी 
 • पंजाबच्या माजी मुख्यमंत्री राजींदर कौर भट्टल पराभूत 
 • अमृतसर पूर्वमधून नवज्योतसिंग सिद्धू विजयी 
 • मानवी हक्क कार्यकर्त्या इरोम शर्मिला मणिपूरच्या थौबल मतदारसंघात पराभूत 
Web Title: lotus blooms in uttar pradesh, uttarakhand