'लव्ह जिहाद'वरून 'जेएनयू' पुन्हा तापले

वृत्तसंस्था
शनिवार, 28 एप्रिल 2018

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि रा. स्व. संघ हे विवेकानंद विचारमंचाच्या आडून विष पसरविण्याचे काम करत आहेत. मुळात विवेकानंद विचार मंच ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचाच मुखवटा आहे.
- गीताकुमारी, "जेएनयूएसयू'च्या माजी अध्यक्षा

चित्रपटाच्या प्रदर्शनास काही संघटनांचा आक्षेप

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये "लव्ह जिहाद'वर आधारित एका चित्रपटाच्या प्रमोशनवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. काही विद्यार्थी संघटनांनी या चित्रपटाला आक्षेप घेत त्याचे प्रदर्शन रोखण्याचा प्रयत्न केल्याने विद्यापीठामध्ये तणाव निर्माण झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून द्वेष मोहीम राबविली जात असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

"ईन दी नेम ऑफ लव्ह - मेलांकोली ऑफ गॉड्‌स ओन कंट्री' असे या चित्रपटाचे नाव असून, "ग्लोबल इंडियन फाउंडेशन' आणि "विवेकानंद विचार मंचा'च्यावतीने या चित्रपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सुदीप्तो सेन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, यामध्ये केरळमधील "लव्ह जिहाद' आणि धर्मांतराचा मुद्दा मांडण्यात आला आहे. "जवाहरलाल नेहरू स्टुंडट्‌स युनियन' आणि "जेंडर सेन्सेशन कमिटी अगेन्स्ट सेक्‍शुअल हॅरेसमेंट' या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध केला आहे. या चित्रपटावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाल्याचे समजते. दोन्ही गटांनी परस्परांविरोधात तक्रारी नोंदविल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: love jihad and jnu