संघात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे- अडवानी

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

मी आतापर्यंत कोणत्याही संघटनेत महिलांचा इतका सहभाग पाहिलेला नाही. तसेच त्या नेतृत्व करत आहेत. हे पाहून मी भारावून गेलो. संघात पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग खूपच कमी आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अधिकाधिक महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, त्यानुसार त्यांना पदे देण्यात यावी, अशी इच्छा भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी व्यक्त केली.

प्रजापिता ब्रह्म कुमारीज या संघटनेच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अडवानी यांनी संघातील महिलांच्या सहभागाबाबत भाष्य केले. या संघटनेत महिलांचा सहभाग पाहून आणि त्यांनी केलेले नेतृत्व पाहून संघाविषयीही अडवानींनी मत व्यक्त केले.

अडवानी म्हणाले, की मी आतापर्यंत कोणत्याही संघटनेत महिलांचा इतका सहभाग पाहिलेला नाही. तसेच त्या नेतृत्व करत आहेत. हे पाहून मी भारावून गेलो. संघात पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग खूपच कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांचा संघात सहभाग वाढला पाहिजे. मात्र, हे सोपे नसून, कठीण आहे. 

कराचीस्थित आपल्या घराची आठवण काढताना ते भावविवश झाले. अडवानी यांचा जन्म आजच्या पाकिस्तानमधील सिंध प्रदेशाची राजधानी कराचीत झाला होता. ते म्हणाले, की कराची आणि सिंध भारताचा भाग नसल्याचे लक्षात येताच मी निराश होतो. मी बालपणी सिंधमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अतिशय सक्रिय होतो. त्यामुळे भारत सिंधशिवाय अपूर्ण असल्याचे मला वाटते.

Web Title: Low Representation Of Women In RSS, Says Senior BJP Leader LK Advani