निकाहनाम्यातच "कबूलनामा'ची तरतूद

वृत्तसंस्था
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

तोंडी तलाक न देण्याची वराकडून घेणार ग्वाही

लखनौ  मुस्लिम समाजात तोंडी तलाकचा होणारा गैरवापर थांबण्यासाठी निकाहनाम्यात नवीन तरतूद करण्याचा विचार "ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड' (एआयएमपीएलबी) हे मंडळ करीत आहे. यानुसार लग्नाच्या वेळेस "मी तोंडी तलाक देणार नाही', अशी ग्वाही नवरदेवाला द्यावी लागणार आहे, असे मंडळाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

तोंडी तलाक न देण्याची वराकडून घेणार ग्वाही

लखनौ  मुस्लिम समाजात तोंडी तलाकचा होणारा गैरवापर थांबण्यासाठी निकाहनाम्यात नवीन तरतूद करण्याचा विचार "ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड' (एआयएमपीएलबी) हे मंडळ करीत आहे. यानुसार लग्नाच्या वेळेस "मी तोंडी तलाक देणार नाही', अशी ग्वाही नवरदेवाला द्यावी लागणार आहे, असे मंडळाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

पत्नीला घटस्फोट देण्याचा एक सोपा मार्ग म्हणून तोंडी तलाकचा वापर मुस्लिम समाजात केला जातो. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी तोंडी तलाकवर बंदीचा आदेश दिला होता. लोकसभेतही बंदी विधेयक मंजूर करण्यात आले आहे. तोंडी तलाक बेकायदा ठरून तलाक देणाऱ्या मुस्लिम महिलेच्या पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद या विधेयकात केली आहे. या विधेयकाचे रूपांतर कायद्यात करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात त्याला मूर्त स्वरूप येण्याची शक्‍यता आहे.

या पार्श्‍वभूमीवर बोलताना "एआयएमपीएलबी' तोंडी तलाकविरोधात आहे, मात्र या विधेयकास आमचा विरोध आहे. असे करणे म्हणजे "मुस्लिम पर्सनल लॉ'मध्ये ढवळाढवळ करण्यासारखे आहे, अशी भूमिका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. "पर्सनल लॉ'मध्ये सुधारणा केल्या जात नसल्याने या मंडळावर टीका होत आहे. ""हे लक्षात घेऊन निकाहनाम्यात (इस्लामी विवाह कायदा) नवीन तरतुदी व निकष आम्ही आणणार आहोत. नव्या निकाहनाम्यात "मी तोंडी तलाक देणार नाही', अशी अट घालण्यात येईल. विवाहप्रसंगी ही अट मान्य केल्यानंतर पती कधीही पत्नीला तोंडी तलाक देऊ शकणार नाही,'' असे मंडळाचे प्रवक्ते मौलाना खलिल उर रेहमान सज्जाद नोमानी यांनी सांगितले. याविषयीची सविस्तर चर्चा हैदराबादमध्ये 9 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत होणार आहे, असे ते म्हणाले.

"तोंडी तलाक'विषयी जनजागृती
हैदराबादमध्ये होणाऱ्या "एआयएमपीएलबी'च्या दोन दिवसांच्या सर्वसाधारण बैठकीत मुस्लिस समाजातील सामाजिक प्रश्‍नांबरोबरच अयोध्येतील वादग्रस्त भूमी वादातील घडामोडींबाबतही चर्चा होणार आहे. समाजातील तोंडी तलाक आणि हुंडा या वाईट प्रथांविरोधात जनजागृती चळवळ उभी करण्यासंबंधी विचार होणार आहे. तोंडी तलाकचे प्रमाण अशिक्षित, अर्धशिक्षित समाजात जास्त असल्याने ग्रामीण भागात याविषयी अधिक जागृती करण्यात येणार आहे. यासाठी मदरशातील विद्यार्थी व शिक्षकांची मदत घेणार असल्याचे नोमानी यांनी सांगितले.

Web Title: lucknow news muslim talaq