...तर मोदींना पर्याय ठरेल 'योगी ब्रॅंड'

narendra modi
narendra modi

कार्यकर्त्यांना लागले 2019चे वेध; आदित्यनाथही मोदींच्या मार्गावर

लखनौ: उत्तर प्रदेशच्या राजकीय क्षितिजावर योगी आदित्यनाथ यांचा अचानक झालेला राजकीय उदय, हा अनेकांना धक्का देणारा ठरला होता. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्यासारख्या बड्या नेत्याऐवजी मोदी यांनी आदित्यनाथ यांच्या नावाला पसंती दिली होती. भविष्यामध्येही दिल्लीतील "टॉप जॉब'साठी मोदींना योगी हा पर्यायी ब्रॅंड ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

मोदी आणि योगी यांच्या उदयामध्येही बरीच साम्यस्थळे दडली आहेत, मोदींनीही लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी यांना बाजूला करत थेट दिल्ली सर केली होती. योगींनीही प्रदेशपातळीवरील अनेक बड्या नेत्यांना डच्चू देत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. योगींनी आपल्या आक्रमक हिंदुत्ववादी प्रतिमेचा वापर स्वत:च्या ब्रॅंड निर्मितीसाठी केला होता. मोदींनीही गोध्रा दंगलीनंतर निर्माण झालेल्या विशिष्ट प्रतिमेचा फायदा उचलला होता. योगींची पाऊले आता दिल्लीच्या दिशेने पडू लागल्याचे त्यांच्या समर्थकांनाही समजू लागले आहे, हे त्यांच्या घोषणांमध्ये झालेल्या बदलावरून ठळकपणे दिसून येते. योगी समर्थक पूर्वी "यूपी में रहना है तो योगी योगी कहना है!' अशा घोषणा देत असत. आता हीच मंडळी "देश का नेता कैसा हो, योगी आदित्यनाथ जैसा हो!' अशा घोषणा देताना दिसतात.

योगी हेच उमेदवार
योगींची खासगी सेना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "हिंदू युवा वाहिनी'ने आतापासूनच त्यांचा भावी पंतप्रधान म्हणून प्रचार करायला सुरवात केली आहे. दिल्ली आणि लखनौमधील वर्तुळातही या चर्चेला वेग आलेला दिसतो. भाजप 2024 मध्ये योगींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करू शकतो. मोदींनी सत्तरी ओलांडल्यानंतर 2024 मध्ये आदित्यनाथ हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहतील.

आव्हानांचा डोंगर
सध्या योगींसमोरील सर्वांत मोठे आव्हान हे उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे आहे, जातीय आणि धार्मिक हिंसाचारामध्ये राज्य होरपळत असून कथित गोरक्षकांच्या गुंडगिरीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. योगींनी अनेकदा इशारे दिल्यानंतरदेखील गोरक्षक हे पोलिसांना जुमानताना दिसत नाहीत. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवता आले नाही तर योगींचा पुढील मार्ग अधिक खडतर होणार आहे.

पहिला हक्क योगींचा
पुढील बारा महिन्यांमध्ये जरी योगींनी उत्तर प्रदेशची घडी बसविली तरीसुद्धा ते पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात. त्यांची उमेदवारी 2019 मध्येही अधिक प्रभावी ठरू शकते, त्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने अधिक जागा पटकावल्यास पंतप्रधानपदावर पहिला हक्क हा योगी आदित्यनाथ यांचा असेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com