उत्तर प्रदेशात अपक्षांचा टक्का वाढला

उत्तर प्रदेशात अपक्षांचा टक्का वाढला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेतली

लखनौ : उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने यश मिळविले असले, तरी अधिक खोलात पाहता वेगळेच चित्र समोर येत आहे. या निवडणुकांमध्ये सर्वच ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी लक्षणीय जागांवर विजय मिळविला आहे.

भाजपचे काही शहरी बालेकिल्ले वगळता अपक्ष आमदारांनी भाजप आणि विरोधकांपेक्षा चांगले यश मिळविले आहे. उत्तर प्रदेशात अपक्षांना प्रथमच असे यश मिळाले आहे. मार्च महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 2.5 इतकी होती. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र त्यांना तब्बल 20.4 टक्के मते मिळाली आहेत. म्हणजेच, मतदारांवर पक्षापेक्षा उमेदवारांचा वैयक्तिक प्रभाव अधिक पडल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, 16 पैकी 14 जागांवर भाजपचे महापौर आले असले तरी विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा त्यांची मते नऊ टक्‍क्‍यांनी कमी झाली आहेत. सर्व विरोधकांना एकूण 66.5 टक्के मते मिळाली आहेत. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या काही काळातील माजी सत्ताधारी असलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षांची मतेही तीन-चार टक्‍क्‍यांनी कमी झाली आहेत. तर, उत्तर प्रदेशातील जनाधार गमावत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या कॉंग्रेची मते मात्र चार टक्‍क्‍यांनी वाढली आहेत.

भाजपने महानगरपालिकांमध्ये यश मिळविल्यामुळे त्याचाच गवगवा झाला. मात्र, निमशहरी भागात त्यांची परिस्थिती खालावली आहे. नगर पंचायत निवडणुकीमध्ये भाजपला केवळ शंभर जागांवर समाधान मानावे लागले असताना अपक्षांनी मात्र 182 जागांवर यश मिळविले. समाजवादी पक्षालाही 83 जागा मिळाल्या, तर बसपला 45, कॉंग्रेसला 17 आणि आम आदमी पक्षाला दोन जागा मिळाल्या. अर्थात, नगर पालिकांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 70 जागा जिंकून अपक्ष (43), सप (43), बसप (29) आणि कॉंग्रेसला (9) मागे टाकले. सर्वाधिक नगरसेवकही भाजपचेच निवडून आले आहेत. यातही अपक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहेत. वॉर्ड सदस्यांच्या सर्वाधिक जागा अपक्षांनी पटकाविल्या आहेत. त्यांच्या तब्बल 7229 जागांपुढे भाजप (1586), सप (903), बसप (477), कॉंग्रेस (271) आणि आप (36) चिल्लर वाटावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com