लखनौच्या दांपत्यांना अखेर पासपोर्ट मंजूर 

पीटीआय
गुरुवार, 5 जुलै 2018

पासपोर्ट काढताना धर्मावरून खिल्ली उडवल्याच्या तक्रारीने प्रकाशझोतात आलेल्या तन्वी सेठ आणि तिचे पती अनस सिद्दीकी यांचा पासपोर्टचा वाद आज मिटला. लखनौ पासपोर्ट कार्यालयाने दोघांचाही पासपोर्ट मंजूर केल्याचे आज स्पष्ट केले. 

नवी दिल्ली/लखनौ : पासपोर्ट काढताना धर्मावरून खिल्ली उडवल्याच्या तक्रारीने प्रकाशझोतात आलेल्या तन्वी सेठ आणि तिचे पती अनस सिद्दीकी यांचा पासपोर्टचा वाद आज मिटला. लखनौ पासपोर्ट कार्यालयाने दोघांचाही पासपोर्ट मंजूर केल्याचे आज स्पष्ट केले. 

लखनौ पासपोर्ट कार्यालयाने दोघांना पासपोर्ट मंजूर करताना म्हटले की, पासपोर्टसाठी आता पत्त्याची खातरजमा करून घेणे गरजेचे नाही. तसेच पोलिसांनी पासपोर्टची पडताळणी करण्यासंदर्भात नवीन नियमांच्या आधारे तन्वी सेठ आणि त्यांचे पती अनस सिद्दीकी यांच्याविरुद्ध कोणताही प्रतिकूल अहवाल दिलेला नाही. अशा स्थितीत या जोडप्याचा पासपोर्ट रद्द केला जाणार नाही. क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी पीयूष वर्मा यांच्या मते, पोलिसांकडून तन्वी आणि अनस यांच्या पत्त्याची पडताळणी न होणे हा प्रतिकूल अहवाल नाही. आता त्यांना कोणत्याही प्रकारची कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार नाही आणि पासपोर्टही रद्द होणार नाही. परराष्ट्र मंत्रालयाच्या नव्या व्यवस्थेनुसार पासपोर्ट तयार करण्यासाठी केवळ दोन माहितीची पडताळणी होणे अत्यावश्‍यक आहे. पहिले म्हणजे अर्जदाराचे नागरिकत्व आणि दुसरे म्हणजे त्याच्या नावावर कोणताही गुन्हा नसावा. पोलिस अहवालानुसार तन्वी आणि अनस भारतीय नागरिक असून दोघांवरही कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल नाही. दोघेही लखनौ आणि नोएडा येथे राहिलेले आहेत. मात्र, पोलिसांनी दोन्ही पत्त्याविरुद्ध प्रतिकूल अहवाल सादर केला आहे. यावर पीयूष वर्मा यांनी म्हटले की, पासपोर्ट तयार करण्यासाठी एक जूनपासून नवीन नियम लागू झाले असून, त्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या पत्त्यावरून प्रतिकूल अहवाल तयार करता येणार नाही. 

प्रकरण काय 
लखनौच्या रतन स्क्वेअर येथे पासपोर्ट सेवा केंद्रात तन्वी सेठ नावाची महिला पासपोर्टसाठी गेली होती. त्या वेळी पासपोर्ट अधीक्षक विकास मिश्र यांनी धर्मावरून खिल्ली उडवल्याचे तन्वी सेठ यांनी आरोप केला. यामुळे तन्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्‌विट करून लखनौ पासपोर्ट कार्यालयात धर्माच्या नावावर अपमानास्पद वागणूक केल्याची तक्रार केली. तन्वी सेठ यांनी 2007 मध्ये अनस सिद्दीकी यांच्यासमवेत विवाह केला होता. त्यांना सहा वर्षांची कन्यादेखील आहे. पासपोर्ट अधीक्षक जेव्हा धर्माच्या नावावर अपमान करत होते, तेव्हा त्यांचे सहकारीदेखील अनेक अपमानास्पद वक्तव्ये करत होते, असे तन्वी सेठ यांचे म्हणणे आहे. तसेच लखनौ पोलिसांच्या पडताळणी अहवालात तन्वी सेठ या एक वर्षापासून नमूद केलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले होते. 

Web Title: Lucknow's couple finally got a passport