मध्य प्रदेशमधील मृतांची संख्या आठ

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 एप्रिल 2018

"बंद'च्या आंदोलनात काल ज्याचा मृत्यू झाला तो पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे झाल्याचे पोलिसांनी आज कबूल केले. या प्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे. "भारत बंद'च्या समर्थकांमध्ये काल झालेल्या संघर्षात एकाचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी याआधी केला होता.

भोपाळ : "ऍट्रॉसिटी' कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी सोमवारी (ता. 2) पुकारलेल्या "भारत बंद'ला हिंसक वळण लागून किमान नऊ जण मृत्युमुखी पडले. मध्य प्रदेशमध्ये मृतांची संख्या मंगळवारी आठ झाली. यातील दोघांचा आज मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर ग्वाल्हेर, भिंड व मोरेना जिल्ह्यातील काही भागांत आजही संचारबंदी लागू करण्यात आली होती. 

"बंद'च्या आंदोलनात काल ज्याचा मृत्यू झाला तो पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे झाल्याचे पोलिसांनी आज कबूल केले. या प्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे. "भारत बंद'च्या समर्थकांमध्ये काल झालेल्या संघर्षात एकाचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी याआधी केला होता. मात्र भिंडचे पोलिस अधीक्षक प्रशांत खरे यांनी महावीर राजावत (वय 40) याचा मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात झाल्याची कबुली दिली. याशिवाय आणखी दोघांचा मृत्यू आज झाला. यातील प्रदीप जाताव हा काल गोळी लागून जखमी झाला होता. त्याचे काल रात्री भिंड जिल्ह्यात निधन झाले, असे जिल्हाधिकारी ईलायराजा यांनी सांगितले. 

दसरश ऊर्फ दर्शन सिंह याचा मृतदेह आज एका शेतात आढळला. डोक्‍यात कुऱ्हाडीचे घाव बसून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी शवविच्छेदनानंतर सांगितल्याचे ईलायराजा म्हणाले. पोलिसांना गोळीबार का करावा लागला याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. आठ मृतांपैकी सहा दलित समाजातील, तर दोन उच्चवर्णीय होते, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Madhya Pradesh 8 Dead Atrocity Act