'जय हिंद' म्हणण्याची शाळेकडून सक्ती !

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

''आपण देशभक्तीसाठी कोणावरही दबाव टाकू शकत नाही. 'जय हिंद' म्हणणे बंधनकारक करता येऊ शकत नाही. सरकारने पहिल्यांदा शिक्षणाची गुणवत्ता पाहिला हवी. सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमी आहे, यावर सरकारने लक्ष द्यायला हवे''. 

-  के. के. मिश्रा, काँग्रेसचे नेते

भोपाळ : सध्या शाळेत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आपली उपस्थिती 'येस मॅडम' किंवा 'येस सर' असे म्हणत दर्शवत असतात. मात्र, मध्यप्रदेश राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'येस सर' किंवा 'येस मॅडम' ऐवजी 'जय हिंद' म्हणणे बंधनकारक केले आहे. राज्य शासनाच्या शालेय विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशाप्रती असलेली देशभक्ती यातून दिसत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मध्य प्रदेशचे शालेय शिक्षणमंत्री विजय शहा यांनी सांगितले होते, की '''येस सर' किंवा 'येस मॅडम' या शब्दांचा वापर केल्याने देशभक्ती दिसत नाही''. त्यामुळे आता राज्य सरकारकडून हा नवा नियम राज्यातील 1,22,000 सरकारी शाळांमध्ये लागू करण्यात येणार आहे. मात्र, हा नियम सरकारी शाळांसाठी असणार आहे. खासगी शाळांसाठी बंधनकारक नसून, पर्यायी असणार आहे. याबाबतची नियमावली सर्व खासगी शाळांना देण्यात येणार आहे, असे शहा म्हणाले. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ही कल्पना प्रथमत: प्रायोगिक तत्वावर अंमलात आणण्यात आली. 

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते के. के. मिश्रा यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''आपण देशभक्तीसाठी कोणावरही दबाव टाकू शकत नाही. 'जय हिंद' म्हणणे बंधनकारक करता येऊ शकत नाही. सरकारने पहिल्यांदा शिक्षणाची गुणवत्ता पाहिला हवी. सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमी आहे, यावर सरकारने लक्ष द्यायला हवे''. 

Web Title: Madhya Pradesh Answer Roll Call With Jai Hind mandatory to Students