
Narendra Modi : मोदीजी विष प्राशन करणारे महादेव; शिवराज सिंह चौहान यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
बंगळुरू - काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बेंगळुरूमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, काँग्रेस विषकुंभ झाली आहे, ते सातत्याने पंतप्रधानांबद्दल विष पसरवत राहते, कधी मोदींना मौत का सौदागर म्हणतात, कोणी म्हणतं सर्व मोदी चोर आहेत, कोणी म्हणतं मोदीजी साप आहेत, कोणी म्हणतात नीच. खरे तर सत्ता हातातून गेल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या अस्वस्थतेतून काँग्रेसकडून विषारी विधाने करण्यात येत आहेत. पण मोदीजी हे विष पिणारे नीलकंठ अर्थात महादेव असल्याचंही चौहान म्हणाले.
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मोदीजी हे साप नाहीत, ते देशाचा श्वास आणि लोकांची आस आहेत. लोकांचा विश्वास आहे. ज्याप्रमाणे ऑक्सिजन संपूर्ण शरीराला जीवन देतो आणि उर्जेने भरतो, त्याचप्रमाणे मोदीजींनी देशाला नवसंजीवनी दिली आहे.
कर्नाटकला एसएमएसपासून वाचवावे लागेल. एसएमएस म्हणजे सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवकुमार. कारण एखादा करप्ट मेसेज मोबाईल खराब करतो, त्याचप्रमाणे हा भ्रष्ट एसएमएस कर्नाटकचे भविष्य खराब करेल. एसएमएस कर्नाटकच्या विकासासाठी धोकादायक, डबल इंजिन सरकारच कर्नाटकला वाचवू शकते, असंही , मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.