पत्नीला दिलेला तोंडी तलाक रद्द 

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

तलाक कुठल्याही पद्धतीनुसार दिला, तरी तोंडी तलाक दिला त्या वेळी अरशी तिथे उपस्थित होती का, हे सिद्ध करण्यात तौसीफ अपयशी ठरला, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे. अशाच प्रकारच्या इतर प्रकरणांमध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत तौसीफ याने दिलेला तोंडी तलाक न्यायालयाने रद्द ठरविला. 

उज्जैन - मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला दिलेला तोंडी तलाक उज्जैन येथील कौटुंबिक न्यायालयाने रद्द ठरविला आहे. मुस्लिमांच्या धार्मिक मजकुरात उल्लेख केल्याप्रमाणे तलाकच्या प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे संबंधित तोंडी तलाक रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय न्यायाधीशांनी नुकताच दिला असल्याची माहिती संबंधित महिलेच्या वकिलाने दिली. 

तौसीफ शेख यांनी आपल्या पत्नीला ज्या पद्धतीने तोंडी तलाक दिला, ती प्रक्रिया बेकायदा आणि सर्व आवश्‍यकता पूर्ण करणारी नाही, त्यामुळे हा तलाक रद्द ठरविण्यात येत असल्याचे उज्जैन येथील कौटुंबिक न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश ओमप्रकाश शर्मा यांनी स्पष्ट केले. देवास येथील तौसीफ यांचा 2013 मध्ये अरशी खान हिच्याशी विवाह झाला होता. काही काळानंतर तौसीफ याने पत्नीकडे पैशांची मागणी केली. आपली मागणी पूर्ण होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तौसीफने पत्नीला त्रास देण्यास सुरवात केली. पतीच्या त्रासाला कंटाळून अरशी ही माहेरी गेली. त्यानंतर तिने हुंडा विरोधी कायद्याच्या अंतर्गत तौसीफच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. 

दरम्यानच्या काळात, 2014 मध्ये दुसऱ्या एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी तौसीफ आणि अरशी यांची उज्जैन येथील न्यायालयाच्या आवारात भेट झाली. त्या वेळी तौसीफने तीन वेळा "तलाक' असे म्हणत अरशी हिला घटस्फोट दिला. तोंडी तलाक दिला असल्याची माहिती तौसीफने एका नोटिशीद्वारे अरशी हिला दिली. तौसीफने दिलेल्या तोंडी तलाकला अरशी हिने कौटुंबिक न्यायालयात आव्हान दिले होते. मुस्लिम धार्मिक मजकुराचे पालन तोंडी तलाक देते वेळी तौसीफने केलेले नाही, असा दावा अरशी हिने केला आहे. 

तलाक कुठल्याही पद्धतीनुसार दिला, तरी तोंडी तलाक दिला त्या वेळी अरशी तिथे उपस्थित होती का, हे सिद्ध करण्यात तौसीफ अपयशी ठरला, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे. अशाच प्रकारच्या इतर प्रकरणांमध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत तौसीफ याने दिलेला तोंडी तलाक न्यायालयाने रद्द ठरविला. 

Web Title: Madhya Pradesh court quashes triple talaq, says husband failed to follow sharia