मध्यप्रदेशमध्ये 60 लाख बोगस मतदार - कॉंग्रेसचा आरोप

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

​मध्य प्रदेशात भाजपकडून लोकशाहीचा खून केला जात असून, स्वतःच्या फायद्यासाठी राज्य सरकार नियमबाह्य गोष्टी करत आहे. 
-ज्योतिरादित्य शिंदे, कॉंग्रेसचे नेते 

नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या असून, या याद्यांमध्ये सुमारे 60 लाख बोगस मतदारांची नावे असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून आज करण्यात आला. याप्रकरणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. मतदार याद्यांची फेरतपासणी करण्याची मागणीही कॉंग्रेसने केली आहे. 

मध्य प्रदेशात चालू वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार लढत होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या असल्याचा दावा कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाबरोबर आज झालेल्या बैठकीत केला. 

कमलनाथ यांच्यासह कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता. नव्याने मतदार याद्या तयार कराव्यात. मतदार याद्यांमधील अनियमिततेसाठी जबाबदार असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही कॉंग्रेसने केली आहे. 

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना कॉंग्रेसचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये सुमारे 60 लाख बोगस मतदार असून, त्यासंदर्भातील पुरावे आम्ही निवडणूक आयोगाकडे सुपूर्त केले आहेत. या नावांचा मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्वक समावेश करण्यात आला आहे. सत्तेचा दुरुपयोग करून अशा गोष्टी केल्या जात आहेत. 

 

Web Title: Madhya Pradesh election 2018: Congress knocks EC door, allege 60 lakh fake voters in state