माझ्यासारखं मजुराचं जीवन मुलाच्या वाट्याला नको; लेकाच्या परीक्षेसाठी बापाने चालवली 85 KM सायकल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

एका मजूराने 85 किलोमीटर सायकल चालवून मुलाला परीक्षा केंद्रावर पोहोचवलं. प्रवास करताना थांबण्याची व्यवस्था नसल्यानं त्यांनी तीन दिवस पुरेल इतकं खाण्याचं साहित्य सोबत घेतलं.

भोपाळ - मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एका मजूराने 85 किलोमीटर सायकल चालवून मुलाला परीक्षा केंद्रावर पोहोचवलं. मध्य प्रदेशात दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. यात मंगळवारी गणिताचा पेपर होता. धार जिल्ह्यातील मनावर इथल्या शोभराम यांचा मुलगा आशिषचे दहावीचे तीन विषय राहिले आहेत. त्याचे परीक्षा केंद्र घरापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. कोरोनामुळे सध्या इतर वाहतुक व्यवस्था ठप्प असल्यानं मंगळवारच्या परीक्षेसाठी मुलाला घेऊन शोभराम सोमवारी रात्री सायकलवरून बाहेर पडले. 

प्रवास करताना थांबण्याची व्यवस्था नसल्यानं त्यांनी तीन दिवस पुरेल इतकं खाण्याचं साहित्य सोबत घेतलं. पहाटे चार वाजता मांडूतील घाटातून त्यांनी प्रवास केला. सकाळी पेपर सुरु होण्याच्या 15 मिनिटं आधी ते परीक्षा केंद्रावर पोहोचले. बुधवारी आणखी एक पेपर झाला असून गुरुवारी इंग्लिशचा पेपर आहे. पेपर होई पर्यंत बाप लेक तिथंच थांबणार आहेत. 

शोभराम यांनी सांगितलं की, मी मजूर आहे पण मुलाला हे दिवस पाहू देणार नाही. मी मजुरी करतो. मुलाला अधिकारी झाल्याचं बघायचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते करेन. मुलगा मन लावून अभ्यास करतो. पण कोरोनाच्या काळात गावात अभ्यास झाला नाही. परीक्षेच्या वेळी शिकवणी लावता आली नाही. त्यामुळे मुलाचे तीन विषय राहिले. मी जास्त शिकलो नाही त्यामुळे फार काही करता आलं नाही. 

हे वाचा - बस अपहरण करणाऱ्या प्रदीप गुप्ताची पोलिसांसोबत चकमक

अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत त्यामुळे मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. त्यानेही परीक्षा देण्याचा हट्ट केला. मनावर ते धार हे 85 किमी अंतर कसं जायचं असा प्रश्न होता. मुलाचा हट्ट विसरून जावं असंही वाटत होतं पण धाडस झालं नाही. शेवटी रात्री बाराच्या सुमारास निघण्याचा निर्णय घेतला. वाटेत काही अडचण आली तर गरजेसाठी 500 रुपये उधार घेतले. तीन दिवसांसाठी पुरेल एवढं खायला घेतलं असंही शोभराम म्हणाले. 

रस्त्यात घाट होता तेव्हा थोडा थकवा जाणवला. आराम करावा असं वाटलं पण उशिर होईल म्हणून विश्रांती घेतली नाही. सकाळी परीक्षेच्या आधी पोहोचलो आणि जेव्हा मुलगा परीक्षेसाठी गेला तेव्हा सगळा थकवा दूर झालं असंही शोभराम यांनी सांगितलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhya pradesh laborer father cycled 85 kilometer for son exam