'यूपी'त कॉंग्रेस पक्षाला महाआघाडीचे वेध

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

राहुल यांना हवी बिहारच्या धर्तीवर आघाडी; "स.प'ही अनुकूल

राहुल यांना हवी बिहारच्या धर्तीवर आघाडी; "स.प'ही अनुकूल
नवी दिल्ली/लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सुरवातीस बॅकफूटवर गेलेल्या कॉंग्रेसने परत एकदा जोरदार मुसंडी मारत भाजपला घेरण्यासाठी मार्चेबांधणी सुरू केली आहे. कॉंग्रेसचे युवा नेते आणि रॉबर्ट वद्रा यांचे मेहुणे तेहसीन पूनावाला यांनी लखनौमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर पक्षाचे राजकीय रणनीतिकार प्रशांतकिशोर (पीके) यांनीही मंगळवारी दिल्लीत समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि अमरसिंह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. बिहारच्या धर्तीवर उत्तर प्रदेशातदेखील महाआघाडी व्हावी, यासाठी खुद्द कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हेच आग्रही असल्याचे समजते. समाजवादी पक्षही यासाठी अनुकूल आहे.

उत्तर प्रदेशातील महाआघाडीमध्ये कॉंग्रेससोबत समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोक दल आणि संयुक्त जनता दल हे पक्ष सहभागी होऊ शकतात. समाजवादी पक्षाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त लखनौमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये कॉंग्रेससह मित्रपक्षदेखील सहभागी होऊ शकतात, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. मुलायमसिंह यांच्याशी झालेला चर्चेचा सविस्तर अहवाल प्रशांतकिशोर यांनी राहुल गांधी यांच्यासमोर मांडला असून, कॉंग्रेसला 125 जागा मिळाल्यास "पंजा' आपले बळ समाजवादी पक्षाच्या पाठीशी उभे करू शकतो.

प्रियांका गांधी सक्रिय
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका यादेखील राजकारणामध्ये सक्रिय झाल्या असून, पक्षाचे धोरण निश्‍चित करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकांमध्येदेखील त्यांनी सहभागी व्हायला सुरवात केली आहे. ऐनवेळी कॉंग्रेस पक्ष प्रियांका यांना मैदानामध्ये उतरवू शकतो, अशी माहिती पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. प्रियांका यांच्या आगमनामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक नेते त्यांचे उघड समर्थन करताना दिसत आहेत.

अमरसिंहांची भूमिकाही महत्त्वाची
उत्तर प्रदेशातील महाआघाडीच्या स्थापनेमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दिल्लीमध्ये प्रशांतकिशोर आणि मुलायमसिंह यांची भेट घडवून आणण्यामध्येही अमरसिंह यांचा मोलाचा वाटा होता. तत्पूर्वी 28 आक्‍टोबर रोजी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी दिल्लीमध्येच अजितसिंह आणि प्रशांतकिशोर यांची भेट घेऊन महाआघाडीच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेला समाजवादी पक्षाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

अखिलेशबाबत राहुल अनुकूल
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी नितीशकुमारांची भूमिका पार पाडावी, अशी राहुल गांधी यांची इच्छा आहे. बिहारमध्ये ज्या पद्धतीने लालूप्रसाद आणि नितीश यांनी तडजोड करत भाजपला पराभूत केले, तोच फॉर्म्युला उत्तर प्रदेशातदेखील वापरला जावा, असे राहुल यांना वाटते. अन्य मित्र पक्षांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यास उत्तर प्रदेशात महाआघाडी तयार होऊ शकते.

Web Title: mahaaghadi by congress party