महाराष्ट्र, गोव्याच्या मत्स्योत्पादनात घट

प्रशांत हिंदळेकर
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

समुद्रातील वादळे मत्स्योत्पादनासाठी फलदायी
समुद्रांतर्गत वादळाचा किनारपट्टीस धोका निर्माण होत असला, तरी समुद्रातील घुसळण्याच्या प्रक्रियेमुळे मासळीला आवश्‍यक असलेले खाद्य मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे दिसून आले आहे. पुढील पिढीच्या दृष्टिकोनातून मत्स्योत्पादनात वाढ करणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने त्या त्या राज्यात कडक कायदे व त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्‍यक असल्याचे मतही डॉ. मोहम्मद यांनी व्यक्त केले.

हद्दीतील घुसखोरीचा परिणाम; कर्नाटक, केरळ, गुजरातच्या उत्पादनात वाढ
कोचीन - अतिरेकी मासेमारीमुळे महाराष्ट्र, गोव्यातील मत्स्योत्पादनात गेल्या काही वर्षांत घट होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. याउलट कर्नाटक, केरळ, गुजरात येथील मत्स्योत्पादन वाढत आहे. या तीनही राज्यांतील मच्छीमारांकडून महाराष्ट्रातील सागरी हद्दीत बेकायदेशीररीत्या घुसून मासेमारी केली जात असल्यानेच हे मत्स्योत्पादन वाढल्याचे दिसून आले आहे. ही माहिती कोचीन येथील केंद्रीय समुद्री मात्स्यिकी अनुंसधान संस्थेचे उपसंचालक डॉ. के. सुनील मोहम्मद यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

प्रत्यक्षात प्रत्येक राज्यातील मच्छीमारांनी आपल्या सागरी हद्दीतच मासेमारी करायला हवी. त्याचबरोबर केरळमध्ये कमी आकाराची मासळी पकडल्यास दंडात्मक कारवाईचा कडक कायदा करण्यात आला असून, असा कायदा देशातील किनारपट्टी भागातील सर्व राज्यांमध्ये झाल्यास मत्स्योत्पादनात निश्‍चितच वाढ होईल, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले.

भाजपनेत्यांना मोठा धक्का; महाविकास आघाडी घेणार मोठा निर्णय

कोचीन येथे नॅशनल फिशवर्कर्स फोरमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या परिषदेच्या निमित्ताने केंद्रीय समुद्री मात्स्यिकी अनुसंधान संस्थेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी भेट देत देशाच्या समुद्रात आढळणाऱ्या विविध मासळींची पाहणी करून माहिती घेण्यात आली. या वेळी विविध राज्यांतील मासेमारीच्या समस्या व उपाय, यावर डॉ. मोहम्मद यांनी मार्गदर्शन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Goa fisheries decline