आज देशात अन् राज्यात काय महत्वाच्या घडामोडी घडल्या? वाचा एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal breaking notifiction

आज देशात अन् राज्यात काय महत्वाच्या घडामोडी घडल्या? वाचा एका क्लिकवर

आमदार रवी राणा यांना जिवे मारण्याची धमकी

आमदार रवी राणा यांना फोन करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी रवी राणा यांचे सचिव विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात किरकोळ कारणावरून मित्राचा गळा दाबून खून

पुण्यातील धक्कादायक प्रकार मित्रानेच मित्राचा किरकोळ वादातून गळा दाबू हत्या करत त्याच्या आत्महत्येचा बनाव रचला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत कोविड-19 ची परिस्थिती आणि तयारी याबाबत बैठक घेतली.

लोणावळ्यात पर्यटकांना मास्क सक्ती, नगरपालिकेने काढले आदेश

देशात वाढत्या कोरोनामुळे लोणावळा नगरपालिकेने पर्यटकांना मास्क सक्ती करण्यात आहे आहे. त्यामुळे आता लोणावळ्यात जाताना मास्क लावणं बंधन कारक असणार आहे.

सिक्कीम : रस्ता अपघातात १६ जवानांचा मृत्यू

सिक्कीममध्ये लष्कराच्या ट्रकला मोठा अपघात झाला असून यामध्ये १६ जवानांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तसेच यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. एका अवघड वळणावर जवानांना घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला.

अफताबच्या नार्को टेस्टचा अहवाल तयार

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी अफताब पुनावाला याच्या नार्को टेस्टचा रिपोर्ट तयार झाला आहे. हा रिपोर्ट फॉरेन्सिक लॅबच्या टीमकडून लवकरच तपास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

टेरर फिंडिंग प्रकरणी NIAकडून जम्मू-काश्मीरमध्ये छापेमारी

जम्मू-काश्मीरच्या विविध भागात एनआयएकडून छापेमारी केली जात आहे. टेरर फंडिंग प्रकरणी हे छापे टाकले जात आहेत. ऑक्टोबर महिन्यात याप्रकरणी एनआयएकडून विविध ठिकाणी छोपे टाकण्यात आले होते. या छापेमारीचं कनेक्शन अल-हुडा एज्युकेशन ट्रस्टशी होतं. त्यानंतर आज पुन्हा ही छापेमारी सुरु झाली आहे.

Disha Salian Case : सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांचे मविआ सरकारवर गंभीर आरोप

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याचे आदेश शिंदे-फडणवीस सरकारनं दिले आहेत. यावरुन हिवाळी अधिवेशनात मोठा गोंधळ सुरु होता. या वादात आता दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी देखील उडी घेतली आहे. या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी मागल्या महाविकास आघाडी सरकारवरही गंभीर आरोप केला आहे.

पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं - राज ठाकरे

नागपूर : पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं. कोणत्याही पराभवानं खचून जाऊ नका, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. काही काळानंतर सत्तांतर होत असतं, असंही ते म्हणाले. राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. ते पुढं म्हणाले, कोणत्याही पदावर असलात तरी दुसऱ्याला कधी तुच्छ लेखू नका. कारण, यातून हातात काही लागणार नाही. मात्र, तुमची बर्बादी होईल. आज तुमच्याकडं फक्त पद आहे. दुसरी माणसं नव्हती म्हणून तुम्हाला पद दिलं असं नाही. तुम्हाला निवडून हे पद देण्यात आलं आहे. त्या पदाची जबाबदारी ओळखा, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

कर्नाटक सरकारपेक्षाही प्रभावी ठराव सोमवारी सभागृहात आणणार - शंभूराज देसाई

नागपूर ः कर्नाटक सरकारपेक्षाही प्रभावी ठराव सोमवारी आपण सभागृहात आणणार आहोत. विधानसभेच्या विद्यमान सदस्य मुक्ता टिळक यांचं दु:खद निधन झाल्यामुळं शोक प्रस्ताव आज सभागृहात मांडण्यात आला. शोक प्रस्तावानंतर सभागृहाचं कामकाज आपण करीत नाही. त्यामुळं सोमवारी हा प्रस्ताव मांडण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद समन्वय समितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

पुण्यात स्कूल व्हॅनला आग

पुण्यातील वारजे परिसरात शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला आग लागली आहे. सुदैवानं यावेळी व्हॅनमध्ये विद्यार्थी नव्हते. वारजे परिसरात असणाऱ्या कावेरी हॉटेल शेजारील लेनमधून स्कूल व्हॅन (एमएच १२ एचबी १३४) जात असताना व्हॅनच्या इंजिननं पेट घेतला. आगीचं कारण समजू शकलं नसलं, ही आग शाॅर्ट सर्किटमुळं लागल्याचा अंदाज आहे.

विरोधकांचा दिवसभरासाठी कामकाजावर बहिष्कार - अजित पवार

मिंध्ये सरकारकडून जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करीत बहुमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. याच्या निषेधार्थ विरोधकांनी आज दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली.

नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला सरकारची मान्यता

नवी दिल्ली - आजपासून नाकातून देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला भारत सरकारच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. हे हेटरोलॉगस बूस्टर म्हणून वापरले जाईल. तसेच ही लस खाजगी रुग्णालयांमध्ये सर्वातधाधी उपलब्ध होणार आहे. आजपासून COVID19 लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश करण्यात येणार आहे. भारतात दोन लशींचे डोस दिले जात आहे. यामध्ये सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. आता नाकावाटे देणाऱ्या लसीचा लसीकरण मोहिमेत भर पडली आहे.

खासदार गिरीश बापटांची उपमुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात घेतली भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. फडणवीस यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन तसंच प्रवीण दरेकर उपस्थित होते.

कोल्हापुरात श्री अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती

चीनसह अमेरिकेत कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केल्याने हिंदुस्थानातही पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधात्मक निर्णयांची अंमलबजावणी सुरू होऊ लागली आहे. विमानतळांवर नियमावली लागू करण्यात आल्यानंतर आता मंदिरांनाही अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार आता कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली असून, शिर्डीतील साईबाबा मंदिरात भाविकांना मास्क वापरण्यासह सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तानाजी सावंतांना मोठा दिलासा, 21 शुगर समूहाची याचिका फेटाळली

उस्मानाबाद : राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ साखर उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्याचे आदेश कर्ज वसुली न्यायालयानं दिलेत. सावंत यांच्याविरोधात माजी मंत्री अमित देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. आता याच याचिकेवर न्यायालयानं सावंत यांना दिलासा दिलाय.

भाजप नेते मोहित कंबोज यांना गुन्हे शाखेकडून क्लीनचीट

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. संजय पांडे आणि मोहित कंबोज यांच्यातील वाद जोरदार चर्चेत होता. यानंतर संजय पांडे यांनाच अटक झाली होती. मोहित कंबोज यांनी थेट पांडेंना आव्हान देत त्यांचेच आर्थिक घोटाळे बाहेर काढले होते. आता याप्रकरणी मोहित कंबोज यांना गुन्हे आर्थिक शाखेकडून क्लीन चीट मिळाली आहे.

ए राजांवर ईडीची मोठी कारवाई, 55 कोटींची बेनामी मालमत्ता जप्त

माजी केंद्रीय मंत्री ए राजा यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीनं ए राजा यांची 55 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त केली आहे. तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथील त्यांची 45 एकर जमीन ईडीनं तात्पुरती जप्त केली आहे.

अजित पवारांनी जयंत पाटलांची केली पाठराखण

आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. तत्पुर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधारांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी जयंत पाटलांची पाठराखण करत त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अयोग्य असल्याचे म्हटले आहे. जयंत पाटील यांनी निर्लज्ज हा शब्द अध्यक्षांसाठी नव्हता. मी ३०-३२ वर्ष झालं राजकारणात आहे. अनेकवेळी असं शब्द वापरलं आहेत. पण हे सरकार सोयीचं सरकार आहे. मुंबईचे महपौर असताना छगन भुजबळ यांनी मुंबई ही सोन्याची कोंबडी आहे असं म्हटलं होत. त्यांच्या या विधानावर भाजपने गोंधळ घातला होता. मी कागपत्राचा दाखला देणार आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना मुंबईला सोन्याची कोंबडी म्हटलं होत. असे अनेकांच्या विधानाचे दाखले देत अजित पवार यांनी जयंत पाटलांची पाठराखण केली.

मिर्झापूरची सानिया बनणार देशाची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट

मिर्झापूरच्या एका मुलीचं सगळीकडे सध्या कौतुक सुरू आहे. मिर्झापूर (मिर्झापूर वार्ता) येथील एका टीव्ही मेकॅनिकच्या मुलीची डिफेंस अॅकॅडमीच्या परीक्षेत निवड झाली आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या १९ जागांपैकी फ्लाइंग विंगमध्ये तिला दुसरे स्थान मिळाले आहे. सानिया मिर्झा आता लवकरच फायटर पायलट बनणार आहे. सानिया मिर्झा एनडीएमधून उत्तीर्ण होऊन देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट बनणार आहे.

सायकलपोलो स्पर्धेसाठी नागपुरात आलेल्या मुलीचा मृत्यू

नागपूर: उपराजधानीत आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय सायकलपोलो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या केरळच्या १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. निदा फातिमा असे मृत खेळाडूचे नाव आहे.

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी

पुण्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी घालण्यात आलीये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. दरवर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं राज्याच्या विविध भागातून नागरिक येत असतात. स्तंभ परिसरात पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी होते, त्यामुळं या परिसरात कोणालाही सभा घेता येणार नाही, असं सांगितलंय.

नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी 'नो मास्क नो एन्ट्री'

सप्तशृंगी गड : आता नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी 'नो मास्क नो एन्ट्री' करण्यात आली आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी मास्क सक्ती असणार आहे. सप्तशृंगी देवस्थाननं हा निर्णय घेतलाय.

आज (शुक्रवार) नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. आजही अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हं आहेत. त्यातच काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलंय, त्यामुळं सभागृहात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. याशिवाय, महाराष्ट्र-कर्नाटक वादही सुरुच आहे. या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपण घेणार आहोत.