दिवसभरात देश अन् राज्यात घडलेल्या घडामोडी वाचा एका क्लिकवर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking News

दिवसभरात देश अन् राज्यात घडलेल्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

  हसन मुश्रीफांची ईडीकडून ८ तास चौकशी! सोमवारी पुन्हा बोलावलं

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची कथित मनी लॉंड्रिंग प्रकरणात आज ईडीकडून ८ तास चौकशी करण्यात आली, या चौकशीचं ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डींग देखील करण्यात आलं. सोमवारी पुन्हा एकदा त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे,

 पुण्यातील बाणेर परिसरात पावसाच्या हलक्या सरी

पुणे शहरातील बाणेर परिसरात संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरींसह पावसाला सुरूवात झाली आहे. तसेच धायरी, सिंहगड रोड, टिळक रोड, पौड रोड, प्रभात रोड या ठीकणी पावसाला सुरुवात झाली आहे.

दादा भुसे, अतुल सावे शेतकऱ्यांच्या भेटीला

विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने पायी काढण्यात आलेल्या लाँग मार्चमधील शेचकऱ्यांच्या भेटीला गेलेले अतुल सावे आणि दादा भुसे हे शहापुर तहसील कार्यालयात दाखल झाले आहेत. याच कार्यालयात सरकारचे हे दोन मंत्री शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाची थोड्याच वेळात भेट घेणार आहेत.

माजी आरोग्य मंत्री दिपक सावंत शिंदे गटात प्रवेश करणार

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून माजी आरोग्य मंत्री दिपक सावंत हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते आजच पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रकमधील माल रस्त्यावर पडल्याने वाहतूककोंडी

पिंपरी : ट्रकमधील मालाची पोती रस्त्यावर पडल्याने वाहतूककोंडी झाली. ही घटना चिंचवडहून पिंपरीकडे जाणाऱ्या ग्रेडसेपरेटरमध्ये घडली. हा ट्रक चिंचगवडहून पिंपरीच्या दिशेने जात होता. त्यामध्ये मोठ्याप्रमाणात पोती भरलेली होती. दरम्यान, यातील काही पोती अचानक रस्त्यावर पडली. यामुळे चालकाने ट्रक थांबवला.

ट्रक रस्त्यातच थांबवल्याने एका लेनच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. दुसऱ्या लेनमधून संथगतीने वाहतूक सुरू आहे. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. ट्रक बाजूला घेण्याचे काम सुरू आहे.

 शेतकरी लाँग मार्चला सरकार समोरे जाणार; चर्चेसाठी दोन मंत्री होणार रवाना

शेतकरी लाँग मार्चला सरकार सामोरे जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सरकारच्या वतीने संतप्त शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे हे लवकरच रवाना होणार आहेत. या दोन मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली जाणार आहे.

मुंबईमधील टेक्सटाईल कमिशनचं ऑफिस दिल्लीला हलवलं जाणार - उद्धव ठाकरे

खासगीकरणावर उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांच्या भरतीवर ९ खासगी यंत्रणा नेमून त्यांचं देखील खाजगीकरण हे सकरकार करत आहेत. सगळ्या यंत्रणा मोडून काढायच्या आणि स्वत:चं आसन सुरक्षित ठेवायचं, बाकी देश आणि राज्य अस्थिर करायचं हा त्या मागचा डाव आहे. मुंबईमधील टेक्सटाईलचं कमिशनचं ऑफिस देखील आता दिल्लीला हलवलं जाणार आहे. अशी माहिती मिळत आहे. तर मुंबईमधील एसीसीचं ऑफिस देखील गुजरातलं गेलं. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही - मंत्री पाटील

पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळं आम्ही त्यांना घाबरून असतो, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार आणि अजित पवारांना टोला लगावला. गुलाबराव पाटील कधी कोणाची टोपी उडवतील याचा नेम नसतो. त्याचाच प्रत्यय जळगावमधल्या विवाह सोहळ्यात आला.

शेतकरी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला जाणार नाहीत

लॉन्ग मार्चमधील शेतकरी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला येणार नाही आहेत. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांजवळ आपला प्रतिनिधी आंदोलनाच्या ठिकाणी पाठवावा, अशी मागणी मंत्री दादा भुसेंकडे केली आहे.

मोर्चेकऱ्यांशी गिरीश महाजन चर्चा करायला जाणार,

 शेतकरी, आदिवासींच्या विविध मागण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा थांबवून यशस्वी तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गिरीश महाजन स्वतः मोर्चाला समोर जावून शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहे.

मुश्रीफ ईडी कार्यालयात दाखल होताच चौकशी अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात दाखल होताच चौकशी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. मुश्रीफांकडून कायद्यांच्या तरतुदीनुसार, चौकशी सुरु असताना आपल्या विधानांची ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी स्टेटमेंट रेकाॅर्ड होत असताना आपले वकील अतीत सोनी आणि प्रशांत पाटील यांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुश्रीफांनी केली आहे.

बायोगॅस टाकीची साफसफाई करताना एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू

बारामती तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. खांडज इथं बायोगॅस टाकीची साफसफाई करताना एकाच कुटुंबातील चार लोक गुदमरून मृत्युमुखी पडले आहेत. बारामती शहरातील सरकारी सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये त्यांना प्राथमिक उपचारासाठी आणलं असता उपचारा अगोदरच त्यांची प्राणज्योत मावळल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

सत्तासंघर्षात राज्यपालांच्या कृतीवरून सुप्रीम कोर्टाची नाराजी

राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं हे सरकार पाडण्याचं कृत्य आहे. सरकार पडेल असं कोणतंही कृत्य राज्यपालांनी करायला नको होतं. जीवाला धोका आहे म्हणून बहुमत चाचणी बोलावणं योग्य नाही, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.

शिवसेना उत्तर प्रदेश संपर्कप्रमुखपदी विक्रम सिंहांची नियुक्ती

शिवसेना मुख्यनेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विक्रम सिंह यांची नियुक्ती केली आहे. विक्रम प्रताप सिंह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या जवळचे मानले जातात.

पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई मूर्तीशी केली छेडछाड, पूजक यांचे वकिल नरेंद्र गांधींचा गंभीर आरोप

कोणत्याही परवानगीशिवाय चेहऱ्यावर यापूर्वी लावलेला लेपचा काही थर काढून टाकला आहे. लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा श्री पूजकांच्या वकिलांचा दावा आहे.

अजित पवार मंत्र्यांवर संतापले, खुद्ध फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी

'जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. मंत्री कशाला केलं जातंय ? महाराष्ट्र बघतोय, एक मंत्री उपस्थित नाही' असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार गैरहजर राहणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांवर चांगलेच संतापले. त्यांच्या या आक्षेपाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली.

पुणे - ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता स्वतः करत आहेत शस्त्रक्रिया

सरकारी कर्मचारी संपावर गेल्यामुळं पुण्यातील ससून रुग्णालयातील सेवेवर ताण पडला आहे. रुग्णांचे कुठलेही हाल होऊ नये यासाठी डाॅ. संजीव ठाकूर स्वःता शस्त्रक्रिया करत आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी आजही शासनातील कर्मचारी संपावर आहेत.

ठाकरे गटाचे वकील तुषार मेहता यांचा युक्तिवाद सुरू

सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे. तुषार मेहता यांच्यानंतर कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत. ठाकरे गटाचा युक्तिवाद आजच पूर्ण होणार आहे.

मुंबई : ज्‍येष्‍ठ अभिनेते समीर खाखर यांचं निधन

ज्‍येष्‍ठ अभिनेते समीर खाखर यांचे आज (बुधवार) निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. दूरदर्शनवरील प्रसिद्ध ‘नुक्कड’ मालिकेत त्‍यांनी खोपडी ही व्यक्तिरेखा साकारून ते घराघरात पोहोचले होते. त्‍यांना श्वसनाचा त्रास होता. काल त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यानंतर त्यांना बोरिवली येथील एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्‍यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्‍यांचे निधन झाले.

अदानी मुद्द्यावरून विरोधी खासदारांचा गदारोळ, कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब

केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक संसदेत अदानीशी संबंधित मुद्दे सातत्यानं उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसद भवन ते ईडी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून अदानी प्रकरणातील तक्रार तपास यंत्रणेकडं सोपवण्याचा निर्णय घेतला.

बारावीचा गणिताचा पेपर लीक

बारावीचा गणिताचा पेपर लीक करण्यात आला. तपासात धक्कादायक बाब उघड झाली आहे. यात एचएससी बोर्डाचे सदस्यही सामील असल्याचा संशय पोलिसांना आहे. 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेला अहमदनगरमधील कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा सुरू होण्याच्या तासाभरापूर्वी ज्या 119 विद्यार्थ्यांचे गणिताचे पेपर लीक केले गेले होते, त्यांची यादी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनुसार, मातोश्री भागुबाई भांबरे कृषी आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात 337 विद्यार्थी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसले होते, त्यापैकी 119 विद्यार्थ्यांचे स्वतःचे कॉलेज हे परीक्षा केंद्र होते.

राज्यातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पूर्ण होण्याची शक्यता आहे. काल शिंदे गटाच्या वकिलांनी बाजू मांडली होती. आज ठाकरे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे.

राहुल गांधींच्या वक्तव्यावर काँग्रेसचा भाजपवर पलटवार

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी परदेशात दिलेल्या वक्तव्याबाबत भाजपनं संसदेत जोरदार घेराव केला आणि अनेक गंभीर आरोप करत प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, आता भाजपच्या प्रश्नांना उत्तरे देताना काँग्रेस पक्षानं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाविरुद्ध बोलले अशा सहा घटनांची यादी जाहीर केली.

लालू यादव व्हीलचेअरवरुन पोहोचले कोर्टात

जमीन घोटाळ्याचं हे प्रकरण 14 वर्षे जुनं आहे. लालू यादव त्यावेळी रेल्वेमंत्री होते. लालू यादव यांनी रेल्वेमंत्री असताना लोकांना रेल्वेत नोकऱ्या देण्याऐवजी जमिनी काढून घेतल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी सीबीआयनं 18 मे रोजी गुन्हा दाखल केला होता.

जे जे रुग्णालयात शासकीय निर्णयाची होळी

जे जे रुग्णालयात मेस्सा आदेशाची होळी करण्यात आली. मेस्सा कायदा मंजूर केल्याचा डाॅक्टरांनी निषेध केला आहे. जे जे रुग्णालयात कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.

मुश्रीफ आज दुसऱ्यांदा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर ईडी कार्यालयात चौकशीसाठी मंगळवारी (14 मार्च) हजर झाले. त्यांना आजही (15 मार्च) चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर तसेच चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर आमदार मुश्रीफ यांनी वकिलांच्या माध्यमातून रिट पिटीशन दाखल केली होती. या याचिकेवर मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा मिळाला आहे. 

मुस्लिमांच्या घरांवर, मशिदीवर दगडफेक; पोलिसांकडून 15 जणांना अटक

कर्नाटकात काही मुस्लिमांच्या (Muslim) घरांवर आणि मशिदीवर (Mosque) दगडफेक झाल्याची बातमी समोर येत आहे. ही घटना हावेरी जिल्ह्यातील आहे. इथं हिंदू संघटना आणि कुरुबा समुदाय संघटनांनी रॅलीदरम्यान मुस्लिमांच्या घरांवर आणि मशिदीवर दगडफेक केली. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतलं आहे.

विशेष बैठकीचं कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ

विधानसभेत सात मंत्री उपस्थित नसल्यामुळं विशेष बैठकीचं कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ आली आहे. सभागृहात आमदारांकडून मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्रीपदासाठी पुढं पुढं जातात, पण कामकाजाच्या वेळी अनुपस्थितीत का राहतात? असा सवाल भाजप आमदार कालिदास कोळमकर यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातून पाकिस्तानी तरुण पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील खडक परिसरातून पोलिसांनी या पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. मोहम्मद अमान अन्सारी असं या २२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. २०१५ पासून हा तरुण भवानी पेठेतील चुडामन तालीम जवळ राहत होता.

चोरीच्या घटना रोखण्यासाठी पुण्यात पोलिसांचा "मॉर्निंग वॉक"

पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्याची अनोखी मोहीम सुरु आहे. कोंढवा पोलीस ठाण्यातील कर्मचारी साध्या वेशात पहाटेच्या सुमारास गस्त घालून व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांसोबत चर्चा करतात. मॉर्निंग वॉक असो किंवा सकाळी अनेक लोक व्यायाम करण्यासाठी सकाळी ६ ते ८ या वेळेत बाहेर पडतात. या दरम्यान गळ्यातील दागिने खेचून घेऊन जाण्यासारखे चोरीचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. या चोरीच्या घटना घडू नये यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यात विविध भागात पावसाची शक्यता

गुरुवार दिनांक 16 मार्च ते 18 मार्चपर्यंत तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. विशेषतः पावसाच्या तीव्रतेची निश्चिती मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात अधिक जाणवत आहे. तर मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

रशियानं काळ्या समुद्रात पाडलं अमेरिकी ड्रोन

युक्रेन युद्धाबाबत रशिया (Russia) आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाबाबत एक मोठी बातमी समोर आलीये. काळ्या समुद्रात रशियन जेट आणि अमेरिकन ड्रोन (American Drones) यांच्यात धडक झाल्याचं वृत्त आहे. ही माहिती अमेरिकेच्या लष्करानं (US Army) दिलीये.

लालबाग : प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह आढळला

मुंबईतील लालबाग परिसरात मंगळवारी (14 मार्च) दोन खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये 53 वर्षीय महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये (Plastic Bag) सापडला. तर, दुसरीकडे एका निर्माणाधीन इमारतीत 19 वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळला. दोन्ही घटना काळाचौकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्या आहेत.

Maharashtra National Live Updates : किसान सभेच्या शेतकरी लाँग मार्चचा आज चौथा दिवस आहे, तर राज्यातील 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलाय. तसेच शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरण गाजत आहे. त्याशिवाय, देशातील काही भागात पावसाची शक्यता आहे. यासह अन्य बातम्यांचा आढावा आपण आज घेणार आहोत.