LIVE Marathi News Update: नवज्योतसिंग सिद्धूंची अखेर सुटका! दहा महिन्यांनंतर तुरुंगातून आले बाहेर I Marathi Breaking News Latest Marathi News Maharashtra Breaking News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking News

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

भाजपच्या 'त्या' निलंबित आमदारावर गुन्हा दाखल

हैदराबादमध्ये रामनवमी शोभा यात्रेदरम्यान द्वेषपूर्ण भाषण केल्याबद्दल भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवज्योतसिंग सिद्धूंची अखेर सुटका! दहा महिन्यांनंतर तुरुंगातून आले बाहेर

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची पटियाला तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. रोड रेज प्रकरणी सिद्धूला एक वर्षाची शिक्षा झाली होती. मात्र शिक्षेचं एक वर्ष पूर्ण होण्याआधी त्यांची सुटका करण्यात आली आहे. सुमारे 48 दिवस अगोदर त्यांची सुटका करण्यात आली आहे. यावेळी कारागृहाबाहेर त्यांच्या समर्थकांची गर्दी दिसून आली. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनी शुक्रवारीच दोन भावनिक पोस्ट टाकल्या.

अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये! बारामती तालुक्यातील गोळीबार प्रकरणी पोलिस महासंचालकांशी बोलणार

बारामती तालुक्यातील सुपे येथील घटनेबाबत मी स्वताः पोलिस महासंचालकांशी बोलणार असून पोलिस यात योग्य तो तपास नक्की करतील असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.

बारामतीत आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ही घटना चिंताजनक असून या बाबत अधिक बोलण्यापेक्षा पोलिसांना सहकार्य करत त्यांच्या तपासावर आपण लक्ष केंद्रीत करु, त्यांचा तपास सुरु असल्याने या बाबत बोलणे अजित पवार यांनी टाळले.

कालीचरण महाराजची लायकी काय? त्याचं शिक्षण काय? आव्हाड भडकले

कालीचारणची लायकी काय, त्याचे शिक्षण आहे काय? देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे आहे. महात्मा गांधी बद्दल बोलणारा कालीचरण कोण? जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराजांवर केली टीका.

संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यामागे इम्तियाज जलील यांचा हात; शिवसेनेचा गंभीर आरोप

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यामागे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.

निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पोलिसांचा पुढाकार 

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला असून विविध पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या बीट ग्रुपवरून मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे. निवडणूक आयोगानं मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार विविध खात्यातर्फे जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. याला पोलीस खात्यानंही प्रतिसाद दिला असून मतदान जनजागृतीमध्ये पोलिसांचा सहभाग वाढल्यानं नागरिकांतून समाधान व्यक्त केलं जात आहे.

संजय राऊत धमकीप्रकरणी फडणवीसांचा खुलासा; म्हणाले, दारुच्या नशेत त्यानं..

कोणी कोणाला धमकी दिली तर या ठिकाणी सरकार आणि पोलिस शांत बसणार नाहीत. संजय राऊत यांना धमकी देणाऱ्याची ओळख पटली आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याने दारुच्या नशेत धमकीचा मेसेज केला आहे, असे उमुख्‍यमंत्री व राज्‍याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१ ) स्‍पष्‍ट केले.

अमेरिका-कॅनडा सीमेजवळ भारतीय कुटुंबासह 8 जणांचे मृतदेह सापडले

अमेरिका-कॅनडा सीमेजवळ एका  भारतीय कुटूंबासह आठजणांचा मृतदेह सापडल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघड झाला आहे. सर्वजण कवेसास्नेजवळ बेकायदेशीरपणे सेंट लॉरेन्स नदी ओलांडून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करत असावेत, असा संशय व्‍यक्‍त होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात 13 एप्रिलपर्यंत जमावबंदी

यवतमाळ जिल्ह्यात 13 एप्रिलपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

मविआच्या सभेमुळं परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार - संजय शिरसाट

महाविकास आघाडीची भव्य सभा छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या (2 एप्रिल)  रोजी पार पडणार आहे. दरम्यान या सभेवरून आता आरोप-प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीच्या सभेमुळं परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार असणार असा, इशारा शिरसाट यांनी दिलाय. 

छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरणातील दोन मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात बुधवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादानंतर जाळपोळ आणि दगडफेकीची घटना समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 400 पेक्षा अधिक हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला, तसंच पोलिसांकडून आता आरोपींची धरपकड देखील करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी आत्तापर्यंत 10 लोकांना अटक केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्यासह 32 जणांवर गुन्हा दाखल

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना मोठा धक्का देण्यात आला आहे. मालेगावमधील वेगवेगळ्या दोन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासह एकूण 32 जणांवर हा गुन्हा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

संजय राऊतांना धमकी देणाऱ्या तरुणाला पुण्यातून अटक

खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाला पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. राहुल तळेकर (वय २३) याला पुण्यातील गुन्हे शाखेनं काल रात्री उशिरा ताब्यात घेतलं. पुण्यातील खराडी भागातून राहुल तळेकर याला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

गाड्या जाळल्या जात होत्या, तेव्हा पोलीस कुठे होते? इम्तियाज जलील यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar Violence) किराडपुरा भागात बुधवारी मध्यरात्री तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांवर आरोप केलाय. माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, ही दंगल थांबवण्यात पोलीस कमी पडली आहेत, असं माझं ठाम मत आहे. मी प्रश्न विचारु इच्छितो, दंगल घडत होती, तेव्हा त्या रात्री पोलीस कुठे होते. 13 गाड्या जाळल्या जात होत्या, तेव्हा पोलीस कुठे होते. फक्त 15 पोलिसवाले ही दंगल थांबवणार होते का? असा सवाल त्यांनी केलाय.

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेंस बिश्नोई यांच्या नावाने संजय राऊत यांना धमकी देण्यात आली आहे. शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

नाशिक : तीन वाहनांच्या अपघातात बारा कामगार जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडिवऱ्हेजवळ शुक्रवारी (दि. 31) सायंकाळी 5.30 च्या सुमारास कंपनी कामगारांची बस, रिक्षा व एक टेम्पो या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात बसमधील 10 ते 12 कामगार जखमी झाले असून काही कामगार गंभीर आहेत. अपघाताची माहिती समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

माजी खासदार संदीपान थोरात यांचं निधन

पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सातवेळा निवडून आलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात यांचं निधन झालं आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून थोरात यांच्यावर सोलापुरातील (Solapur) खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान काल (31 मार्च) त्यांची प्राणज्योत मालवली.

पुढील 5 दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता नाही - हवामान तज्ज्ञ खुळे

आजपासून (1 एप्रिल) पुढील 5 दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसाची शक्यता जाणवत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल जाणवत आहे. कुठे उन्हाचा कडाका आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे.

2024 मध्ये महाविकास आघाडीचं पानिपत होणार - संदीपान भुमरे

कितीही सभा घेतल्या तरी 2024 मध्ये महाविकास आघाडीचं पानिपत होणार असल्याचं वक्तव्य मंत्री संदीपान भुमरे यांनी केलं. ते बीड जिल्ह्यातील नारायणगड इथे बोलत होते. छत्रपती संभाजी नगरमध्ये 2 एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेवरही मंत्री संदीपान भुमरे यांनी भाष्य केलं. 

इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशमधील इंदूरच्या झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या दिवशी अपघात झाला. विहिरीचं छत कोसळल्यानं भाविक विहिरीत पडले. या दुर्घटनेत आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाला 17 ते  18 जणांना वाचवण्यात यश आले, तर अजूनही काही जणांवर  रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Latest Marathi News : कर्नाटकात निवडणुका जाहीर होताच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 9 एप्रिलला कोलार इथं जाहीर सभा होणार आहे. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. महाराष्ट्रात सावरकर मुद्दाही गाजत आहे. तसंच देशातील 17 जिल्ह्यात हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून घेणार आहोत.