
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
राज्यात आठवड्याभरता ७६ लाखापेक्षा अधिक महिलांनी केला एसटीतून प्रवास
एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने आठवड्याभरात राज्यभरातून ७६ लाखापेक्षा जास्त महिला प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून धावणाऱ्या एसटीमधील महिला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे महिला प्रवाशांचा सोयीसाठी एसटी महामंडळ लवकरच रेल्वे,बेस्टप्रमाणे महिला स्पेशल एसटी चालविण्याचा निर्णय घेऊ शकते अशी माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबईत ग्रँटरोडमध्ये माथेफिरूकडून चाकू हल्ला; दोन जणांचा मृत्यू
राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसचे आंदोलन
पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे खासदारपद रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस चे आंदोलन
पुण्यात युवक काँग्रेस तर्फे स्वारगेट एस टी स्टँड जवळ आंदोलन.
भाजप विरोधी घोषणा देत काँग्रेसकडून दिलेल्या निर्णयाचा विरोध.
राष्ट्रवादी अन् चंद्रकांत पाटील; इंदापूर शहरातील फ्लेक्सची सर्वत्र चर्चा
इंदापूर शहरात चंद्रकांत पाटील थेट राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. कायम एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांच्या या एकत्रित बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
आमदार राजन साळवींसह कुटुंबीयांची आजची चौकशी पुढं ढकलली
ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी आज (२४ रोजी) होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राजन साळवी हे अलिबाग लाचलुचपत विभागासमोर हजर राहणार नाहीत. दरम्यान, पुढील महिन्यात ३ किंवा ४ एप्रिल रोजी ही चौकशी होणार असून, त्यावेळी सर्वांना हजर व्हावे लागणार आहे.
मोदी सरकार लोकशाही संपवण्याचं पाप करत आहे; पटोलेंचा गंभीर आरोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई केली आहे, याचा नाना पटोले यांनी निषेध व्यक्त केला आहे. मोदी सरकार लोकशाही संपवण्याचं पाप करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची सायंकाळी पाच वाजता महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस नेत्यांची ही बैठक बोलवण्यात आली आहे.
मोठी बातमी! राहुल गांधींची खासदारकी रद्द
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना सूरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना जामीनही मिळाला होता. मात्र त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली आहे.
सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; आरोपीला कोल्हापुरातून अटक
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. मुंबई पोलिसांनी आता आरोपीला कोल्हापुरातून अटक केली. रेहान मुजावर असं आरोपीचं नाव आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी 70 लाख 70 हजार रुपये जप्त केले आहेत.
सुडाच्या राजकारणावर राऊतांचा जोरदार हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावात सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिक-मालेगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शिवसैनिकांचा उत्साह पाहायला मिळत असून पक्षाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक येथे दाखल झाले आहेत. आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या सुडाच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला. सरकारी यंत्रणा या एकाच पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
लातुरात शॉर्ट सर्किटच्या आगीत सात खासगी बसेस जळून खाक
शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लातूर शहरातील एका गॅरेजमधील सात खासगी बसेस जळून खाक झाल्या. या आगीमध्ये सुमारे दोन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवार रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास रिंग रोडवर ही घटना घडली. या विषयी अधिक माहिती अशी की, विजेची तार तुटून शॉर्टसर्किट झाले होते.
छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधातील याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचे नाव बदलून नुकतेच ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्यात आले आहे. या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. सदर याचिका आज २४ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस आली असता, सदर जनहित याचिका स्विकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच नामांतरासंदर्भातील सदर याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतल्याचेही सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सुनाणीदरम्यान स्पष्ट केले आहे. या जनहित याचिकेवर आता सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिकेचा प्रशासकीय अर्थसंकल्प घोषित
पुणे महानगरपालिकेचा प्रशासकीय अर्थसंकल्प घोषित करण्यात आला आहे. २०२३-२४ वार्षिक अर्थसंकल्प पुणे महानगरपालिकेचे आयुक्त (प्रशासक) यांनी घोषित केला. महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी ९५१५ कोटी रुपयांचे बजेट मांडले. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या बजेट मध्ये ९२३ कोटींची भर आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद पाणीपुरवठासाठी करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी १३२१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Twitter चा यूजर्सना झटका, पेड सबस्क्रिप्शन नसणाऱ्यांचं ब्लू टिक हटवणार
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने युजर्सना मोठा झटका दिला आहे. १ एप्रिलपासून सशुल्क सबस्क्रिप्शन नसणाऱ्या ट्विटर वापरकर्त्यांच्या अकाऊंट्सचे ब्लू टिक हटवण्यास सुरुवात करणार आहे. ट्विटरकडून परिपत्रक जारी करत नवीन सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार, अनपेड ट्विटर अकाऊंटचं ब्लू टिक सबस्क्रिप्शन हटवण्यात येईल. 1 एप्रिलपासून ट्विटरकडून हे नवीन नियम लागू करण्यात येतील.
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात भाजपकडून पुण्यात आंदोलन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आज पुण्यात आंदोलन करण्यात आले. पुण्यातील गुडलक चौकात भाजपकडून हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसनं रविवारी संध्याकाळी त्यांच्या ट्विटर हँडलवरून "सावरकर समजा क्या..नाम राहुल गांधी है" असं ट्विट केलं होतं. याच्या विरोधात आज भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळाली.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
आज सकाळी 10:31 वाजता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं दिली.
बेकायदेशीर संघटनेचे केवळ सदस्यत्व असलं तरी देखील तो गुन्हाच ठरणार - सुप्रीम कोर्ट
UAPA कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बेकायदेशीर संघटनेचे केवळ सदस्यत्व असलं तरी देखील तो गुन्हाच ठरणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने केवळ सदस्यत्व असणं गुन्हा ठरू शकत नाही असा निर्णय दिला होता. तो निकाल आज तीन न्यायमूर्तींच्या पीठाने बदलला आहे.
पुण्यात पोलिसांनी केली पोलिसांच्याच गाडीवर कारवाई
पुण्यात नियम तोडणाऱ्या पोलिस वाहनावर वाहतूक विभागानं कारवाई केली आहे. पुणे पोलिस दलातून अधिकारी-कर्मचारी यांनी मजूर अड्डा या ठिकाणी फुटपाथवर गाडी उभी केली होती. विचित्र पद्धतीनं आणि नियम डावलून गाडी उभी केल्यामुळं नागरिकांना चालताना त्रास सहन करावा लागला होता. वाहतूक विभागाला या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या पोलिस वाहनावर कारवाई करत चलन तयार केलं. ज्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली ही गाडी होती, अशा पोलीस अधिकाऱ्याकडून व्यक्तिगत चलन दंडसुद्धा आकारला गेला.
ईडी, सीबीआय विरोधात 14 पक्षांची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
ईडी आणि सीबीआय या संस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात 14 पक्षांनी याचिका दाखल केली आहे. काँग्रेससह 14 पक्षांनी ही याचिका दाखल केली. तृणमूल काँग्रेस, बीआरएस, डीएमके आणि इतर पक्षांचा देखील यात समावेश आहे.
रेणुका चौधरी मोदींवर अब्रुनुकसानीचा दावा करणार!
राहुल गांधींना (Rahul Gandhi) शिक्षा होताच काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी (Renuka Chaudhary) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलंय. आपण दावा केल्यानंतर न्यायालयात किती वेगानं हालचाली होतात, तेही पाहणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. सूरत न्यायालयानं राहुल गांधींना अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिक्षा सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर चौधरींनी संताप व्यक्त केला आहे.
प्रभू राम फक्त हिंदूंचेच नाहीत, तर मुस्लिम-ख्रिश्चनांचेही देव आहेत - फारुख अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि एनसीचे प्रमुख डॉ. फारुख अब्दुल्ला (Dr. Farooq Abdullah) यांनी मोठं वक्तव्य केलंय. भगवान राम (Lord Ram) हे फक्त हिंदूंचेच देव नाहीत, तर ते मुस्लिम, ख्रिश्चन आणि सर्वांचेच देव आहेत, असं त्यांनी म्हटलंय.
युवासेना पदाधिकारी साईनाथ दुर्गेची कारागृहातून सुटका
शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचा शोभा यात्रा दरम्यान एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडिओ खरा नसून मॉब करून प्रसारित केल्याचा गुन्हा दहिसर पोलीस ठाण्यात नोंदविला होता. या प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना पदाधिकारी साईनाथ दुर्गेसह सहा पदाधिकाऱ्यांना दहिसर पोलिसांनी अटक केली होती. अखेर बोरीवली न्यायालयानं शुक्रवारी संध्याकाळी जामीन मंजूर केला होता. अखेर आज साईनाथ दुर्गेची यांची सुटका करण्यात आली आहे.
चित्रपटाच्या सेटवर अक्षय कुमारचा अपघात
मनोरंजनसृष्टीत काम करताना अनेकवेळा भयानक स्टंट करावे लागतात. काही कलाकार यासाठी बॉडी ड्बलचा वापर करतात. तर काही स्वतःच हे स्टंट करतात. या यादीमध्ये खिलाडी अक्षय कुमारचाही समावेश होतो. अक्षय कुमार बॉडी डबलशिवाय चित्रपटाच्या सेटवर धोकादायक ऍक्शन सीक्वेन्स आणि स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, स्कॉटलंडमध्ये त्याच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली आहे. टायगर श्रॉफसोबत ऍक्शन सीनचं शूटिंग करत असताना अक्षय कुमारचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अक्षय कुमार जरी जखमी झाला असला, तरी त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याने तो शूटिंग सुरुच ठेवणार आहे.
पुण्यात तरुणांचा धुडगूस, 14 गाड्या फोडल्या
पुण्यात तरुणांनी धुडगूस घातला असून १४ गाड्या फोडून नुकसान केले आहे. परिसरात दहशत रहावी म्हणून १०-१२ जणांनी तलवारीनं गाड्या फोडल्या. रिक्षा, दुचाकी, टेम्पो, चारचाकी, दुचाकी अशा विविध गाड्यांचं नुकसान केलं आहे. पुण्यातील कोंढवा भागातील टिळेकर नगरमधील घटनेमुळं नागरिक भयभीत झाले आहेत. हृषिकेश गोरे (२०), सुशील दळवी (२०), प्रवीण भोसले (१८) अशी आरोपींची नावं असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हा सगळा प्रकार बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला.
बाॅलीवूडचे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन
बॅालीवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं आज निधन झालं. त्यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. परिणीता, लागा चुनरी में दाग, मर्दांनी अशा अनेक सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.
जालना : जमिनीच्या वादातून सावत्र भावाचा गळा आवळून खून
वडिलांच्या मालकीची 2 एकर शेती नावावर करून देत नसल्याचा रागतून सावत्र भावाचा रूमालाने गळा आवळून नाका तोंडात माती कोंबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विराज कुढेकर (८ वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. ऋषिकेश कुढेकर याने जगन्नाथ जाधव यांच्या उसाच्या शेतात नेऊन हात रुमालाने गळा आवळून नाका तोंडात माती भरून विराज कुढेकरला ठार मारल्याची घटना अंबड तालुक्यातील भार्डी या गावात घडली.
राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेस मोठ्या आंदोलनाच्या तयारीत
सुरतच्या एका न्यायालयानं (Surat Court) गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव' संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं. न्यायालयानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, वायनाडच्या खासदाराला 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर लगेच जामीन मिळाला. राहुल गांधींनी 'सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव का आहे?', असं कथित वक्तव्य केल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसनं (Congress) मोठ्या आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेसनं रस्त्यावर उतरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची इतर पक्षांसोबत भेट घेण्याचा निर्णय घेतलाय. मुख्य विरोधी पक्षानं न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच जनआंदोलनाची घोषणा केली.
मुंबईत धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमावेळी अंनिस कार्यकर्त्यांना दिलेल्या नोटिसा रद्द
धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा मुंबई मिरा रोड येथे १८ व १९ मार्च रोजी झालेल्या दिव्य दर्शन कार्यक्रम झाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या कार्यक्रमाला विरोध केला होता. त्यासंबंधी पोलिसांना निवेदन देखील देण्यात आले होते. धीरेंद्र शास्त्री महाराज हे अंधश्रद्धा पसरवतात आणि चमत्काराचा दावा करतात, असा आरोप अंनिसने केला होता. तसेच धीरेंद्र शास्त्री हे संत समाजसुधारकांचा अवमान करणारे भाष्य करतात, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम रद्द करुन कारवाई करण्याची मागणी अंनिसने केली होती. मात्र, या उलट मीरा रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी धिरेंद्र शास्त्रीवर कारवाई करण्याऐवजी महाराष्ट्र अंनिसने कार्यक्रमात धरणे, निदर्शने, आंदोलन करू नये म्हणून कलम १४९ अंतर्गत अंनिसचे राज्य प्रधानसचिव नंदकिशोर तळाशीलकर आणि अन्य कार्यकर्त्यांना नोटीस दिली. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर लाँच
येत्या 29 तारखेला उद्धव ठाकरेंची मालेगावात जाहीर सभा होणार आहे. बरं झालं गद्दार गेले अशा आशयाचा टीझर लाॅंच करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
विजय माल्यावर 17 बँकांचे 900 कोटींचे थकीत कर्ज, सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल
प्रसिद्ध उद्योगपती आणि फरार असलेला आर्थिक गुन्हेगार विजय माल्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल झाले आहे. तब्बल 17 भारतीय बँकांचे कर्ज कर्जबुडवल्या प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. विजय मल्याकडे कर्ज फेडण्यासाठी पुरेसा पैसा होता, तरीही त्यानं कर्ज फेडलं नसल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.