
LIVE Marathi News Updates : उत्तर सभा घेण्याआधी शेतकऱ्यांना उत्तरे द्यावे - उद्धव ठाकरे
LIVE Marathi News Updates : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळं त्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. वंचित बहुजन आघाडी निवडणूक आयोगाविरोधात आज आंदोलन करणार आहे. तसेच आज मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे. तर, नांदेडमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची सभा होणार आहे. या शिवाय, देशभरात पावसाचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून घेणार आहोत.
शेतकर्याला केवळ हमी भाव नाही तर हमखास भाव मिळायलाच पाहिजे
मला उत्तर द्यायला उत्तरसभा घेणार आहात ना? रतनकाका सारख्या शेतकर्याला जे तुमच्या नाकर्तेपणामुळे पिचले गेले आहेत त्यांना आधी उत्तर द्या. शेतकर्याला मार्गदर्शन मिळायला हवं, पिकलं की विकलं गेलच पाहिजे. शेतकर्याला केवळ हमी भाव नाही तर हमखास भाव मिळायलाच पाहिजे हा माझा आग्रह होता.
मी तुमच्या प्रश्नांसाठी लढतोय - उद्धव ठाकरे
आज आपलं नाव, धनुष्यबाण चोरलं, माझ्या हातात काहीही नाही तरी इतकी गर्दी, ही पुर्वजांची पुण्याई आणि जगदंबेची कृपा. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही शपथ घेतली, पण मी तुमच्या प्रश्नांसाठी लढतोय. - उद्धव ठाकरे
सत्तेवर आल्यावर पहिले पाऊल होतं माझ्या शेतकर्यांना कर्जमुक्त करणे
कोरोनाच्या संकटात सर्वांनी सहकार्य केलं, त्यामुळे मोठ्या संकटात वाचलो. तुम्हा सर्वांचे आभार. सत्तेवर आल्यावर पहिले पाऊल होतं माझ्या शेतकर्यांना कर्जमुक्त करणे...
मुख्यमंत्री पद येत आणि जात पण...
मुख्यमंत्री पद येत आणि जात पण आपल्या कुटुंबातील एक माणुस म्हणून तुम्हीं जे प्रेम मला दिलत ते मला नाही वाटतं गद्दारांच्या नशीब असेल. - उद्धव ठाकरे
शिवसेना आजही ठामपणे या जमिनीवर उभी
शिवसेना कुठेही तुटलेली नाही, हललेली नाही, झुकलेली नाही... इलेक्शन कमिशन ने चिन्ह काढलं असेल, नाव काढुन घेतल असेल पण बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आजही ठामपणे या जमिनीवर उभी आहे, तिच्या हातात भगवा झेंडा आहे ! - संजय राऊत
हे तुफान उसळलं आहे...
हे तुफान उसळलं आहे... या तुफानाला आता कोणी रोकु शकत नाही. हे 'मालेगाव के शोले'. शिवसेना काय हे पहायच असेल तर निवडणूक आयोगाने इथे येऊन पहावं - संजय राऊत
उद्धव ठाकरेकी प्रामाणिकता पर संदेह नहीं किया जाता
चीते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और उद्धव ठाकरेकी प्रामाणिकता पर संदेह नहीं किया जाता! - शिवसेना नेते संजय राऊत
मालेगावचा ढेकूळ चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही - संजय राऊत
उद्धव ठाकरे यांच्या सभेला सुरूवात....
उद्धव ठाकरे यांच्या सभेला सुरूवात झाली. मालेगावत उद्धव ठाकरे यांची प्रचंड सभा आहे. या सभेत उद्धव ठाकरे शिंदे गटाचा समाचार घेणार आहेत.
एकनाथ शिंदे कुटुंबासह राज ठाकरे यांच्या घरी!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह कुटुंबासह राज ठाकरे यांच्या घरी गेले आहेत. स्नेहभोजनासाठी एकनाथ शिंदे राज यांच्या घरी गेल्याची चर्चा आहे.
सलमान खान जीवे मारण्याची धमकी प्रकरणी एकाला अटक
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राजस्थानमधून एकाला अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 ते 28 मार्चपर्यंत पश्चिम बंगाल दौऱ्यावर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 ते 28 मार्चपर्यंत पश्चिम बंगाल दौरा करणार आहेत
काँग्रेस नेत्यांनी राजघाटावर वाहिली श्रद्धांजली
काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा, केसी वेणुगोपाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर नेत्यांनी राजघाटावर श्रद्धांजली वाहिली.
JDS च्या रॅलीनंतर फेकलेलं अन्न खाल्ल्यामुळं पोट फुगून 15 गायींचा मृत्यू
कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील (Karnataka Yadgir) येरागल गावात अन्नातून विषबाधा होऊन 15 गायींचा (Cow) मृत्यू झाला आहे. जेडीएसच्या रॅलीनंतर टाकाऊ अन्न खाल्ल्यामुळं ह्या गायी आजारी पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 24 मार्चला जनता दल सेक्युलरनं (JDS) गुरुमितकल मतदारसंघात पक्षाचे उमेदवार शरणागौडा कंडाकूर (Sharanagouda Kandkur) यांच्या समर्थनार्थ पंचरत्न यात्रा सुरू केली होती.
जनतेला पंतप्रधान मोदींच्या बरोबरीनं पुढं जायचंय - गृहमंत्री अमित शहा
कर्नाटक : नुकत्याच ईशान्येत निवडणुका झाल्या. यात काँग्रेसला कोणत्याही राज्यात 5 पेक्षा जास्त जागा मिळवता आल्या नाहीत. तिन्ही राज्यात एनडीएला यश मिळालं आहे. जनतेला पंतप्रधान मोदींच्या बरोबरीनं पुढं जायचं आहे. शहरातील विकासासाठी मी रायचूरच्या जनतेला भाजपला मतदान करण्याचं आवाहन करतो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचा कोची विमानतळावर अपघात
केरळ : भारतीय तटरक्षक दलाच्या ALH ध्रुव मार्क 3 हेलिकॉप्टरचा आज कोची विमानतळावर मुख्य धावपट्टीजवळ अपघात झाला. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. विमानाचं रोटर्स आणि एअरफ्रेमचं नुकसान झालंय. अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी ICG नं चौकशीचे आदेश दिले आहेत.
मालेगावच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का; माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरे यांची आज (रविवार) मालेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेपूर्वीच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला आहे. कारण, ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये 3 माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नागपुरातील काही भागात जोरदार, तर काही भागात हलक्या पावसाच्या सरी
विदर्भात हवामान खात्यानं आज पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पाऊस झाला. यात शहरातील काही भागात 10 ते 15 मिनिट जोरदार पाऊस झाला, तर काही भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. आज आणि उद्या विदर्भात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
पुण्यात सलग चौथ्या दिवशी गाड्यांची तोडफोड
पुण्यात सलग चौथ्या दिवशी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. दारूच्या नशेत टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाड्यांची ही तोडफोड झाली आहे. वानवडी गावठाणातील ही घटना आहे.
CM एकनाथ शिंदे राज्यभरात 'धनुष्यबाण यात्रा' काढणार
शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याची घोषणा केली आहे. 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून या सभेला सुरवात होणार आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या याच सभांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहेत. कारण, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात 'धनुष्यबाण यात्रा' काढणार आहेत.
रत्नागिरीत परशुराम घाटातील वाहतूक काही दिवसांसाठी बंद होणार
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी हा घाट बंद ठेवून काम जलद गतीनं व्हावं, यासाठी ठेकेदारानं परवानगी मागितली आहे. आठ दिवस घाट बंद करून घाटातील एक बाजू पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली तर पर्यायी मार्गानं वाहतूक सुरळीत राहील का? यासाठी प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे. काही दिवसांतच मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक आठ दिवस बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रियंका गांधींचं परिवारवादाच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी परिवारवादाच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आपल्या कुटुंबावरील आरोपांना प्रत्युत्तर देताना प्रियंका गांधींनी भाजपला सवाल केलेत. जर तुम्ही आम्हाला परिवारवादी म्हणत असाल तर प्रभू राम कोण होते? त्यांनी आपल्या कुटुंबाप्रती आपला धर्म पाळला, मग ते परिवारवादी होते का? पांडव त्यांच्या कौटुंबिक मूल्यांसाठी लढले म्हणून ते कुटुंबवादी होते का? असे सवाल प्रियंका गांधींनी केले आहेत. राजघाटावर काँग्रेसच्या संकल्प सत्याग्रहाला पोहोचलेल्या प्रियांका गांधींनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
समुद्रात रामसेतू बांधण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयात याचिका
सर्वोच्च न्यायालयाकडं समुद्रात काही मीटर/किलोमीटर भिंत (रामसेतू) बांधण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
महिला काँग्रेसतर्फे तोंडाला पट्ट्या बांधून केंद्र सरकारचा निषेध
पुण्यात महिला काँग्रेसचं मूक आंदोलन सुरु आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या महिला पदाधिकारी तोंडाला पट्ट्या बांधून निषेध आंदोलन करत आहेत.
'अवयव दान' एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा एक मोठा मार्ग - PM मोदी
'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, 2013 मध्ये आपल्या देशात अवयवदानाची 5 हजारांहून कमी प्रकरणं होती. मात्र, 2022 मध्ये ही संख्या 15 हजारांहून अधिक झाली आहे. ज्या व्यक्तींनी अवयव दान केलं, त्यांच्या कुटुंबीयांनी खरोखरच मोठं कार्य केलं आहे. असे अनेक लोक आहेत जे आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी आपली संपूर्ण पेन्शन खर्च करतात, तर काहीजण आपल्या आयुष्याची संपूर्ण कमाई पर्यावरण आणि प्राण्यांच्या सेवेसाठी समर्पित करतात.
राहुल गांधींच्या ट्विटर बायोमध्ये मोठा बदल
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय. सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेने राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केल. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर बायोमध्ये मोठा बदल केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा बायो अपडेट केला असून त्यात 'अपात्र लोकसभा सदस्यत्व' असे लिहिले आहे.
मिसिसिपी राज्याला चक्रीवादळाचा तडाखा; 25 जणांचा मृत्यू
अमेरिकेच्या दक्षिण-पूर्वेकडील मिसिसिपी राज्यामध्ये शुक्रवारी आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज ठाकरे पुण्यात होणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाचा आढावा घेणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात होणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. या प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध आहे. या प्रकल्पांतर्गत सहा हजार झाडांची कत्तल होणार असल्याकारणानं अनेक पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाचा विरोध केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात असताना वसंत मोरे यांनी त्यांना या प्रकल्पाबाबत अधिक माहिती दिली.
राज ठाकरेंनी वसंत मोरेंची पुण्यात घेतली भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आहेत. राज ठाकरेंनी आज पुणे दौऱ्यावर असताना पक्षाचे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली. वसंत मोरे यांनी पुण्यातील कात्रज भागात उभारलेल्या श्वान संगोपन केंद्राचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी येथे सुरू झालेल्या केंद्राचा आढावा घेतला. राज ठाकरे यांचं श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. ग्रेड डेन प्रजातीचं "जेम्स" नावाचा श्वान राज ठाकरे यांच्याकडं होता. मात्र, जून २०२१ मध्ये त्याचं निधन झालं.
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 5 एप्रिलपासून आठवड्यात 4 दिवस
कोल्हापूर-मुंबई ही स्टार एअरची विमानसेवा येत्या पाच एप्रिलपासून आठवड्यातून चार दिवस उपलब्ध होणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवार अशी ही सेवा सुरू राहील, असे स्टार एअरच्या प्रशासनाने सांगितले. यापूर्वीच्या सेवेत आता एक दिवस वाढला आहे.
नवी मुंबईतील कोपर खैरणेमध्ये संभाजीराजेंची सभा
स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंर आज (२६ मार्च) नवी मुंबईतील कोपर खैरणेमध्ये सभा होणार असून या सभेत स्वराज्य संघटना राजकीय रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. इतकेच नव्हे तर, संभाजीराजे छत्रपती काही मोठे राजकीय स्फोट करणार असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.
PM नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता करणार 'मन की बात'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार) 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मन की बातच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाची ही ९९ वी आवृत्ती आहे. दुसरीकडं, पंतप्रधान मोदींची 2023 मधील ही तिसरी मन की बात आहे. 'मन की बात' हा पंतप्रधान मोदींचा मासिक रेडिओ कार्यक्रम आहे.
राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचं राजघाटावर आंदोलन, पोलिसांनी परवानगी नाकारली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं संसदेचं सदस्यत्व गमावल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसनं आंदोलन सुरु केलं आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी या सत्याग्रह आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. पोलिसांनी कलम 144 चा हवाला दिला आहे. या सत्याग्रहात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही सहभागी झाल्या आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आज देशभरात निदर्शने करतील आणि प्रत्येक राज्यात गांधी पुतळ्यासमोर आपला निषेध नोंदवतील.
युवा नेते तेजस शिंदेंची राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) युवा नेते तेजस शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तिपत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षपदाचा श्री. शिंदे यांनी मध्यंतरी राजीनामा दिला होता.
ISRO ची मोहीम फत्ते; सर्वात मोठ्या 'रॉकेट'मधून 36 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या सर्वात मोठ्या LVM3 रॉकेटने OneWeb चे 36 उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. रविवारी सकाळी ९.३० वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले.
सीएसएमटी ते पनवेल मार्गावर दोन्ही बाजूंची लोकल वाहतूक पाच तास बंद
मुंबईत लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणांच्या तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, सीएसएमटी ते पनवेल दरम्यानची वाहतूक पाच तास बंद राहणार आहे. त्यामुळे सुट्टी दिवशी लोकल प्रवाशांना बाहेर पडताना काळजी घ्यावी लागणार आहे.
इस्रोचं सर्वात मोठं रॉकेट काही वेळात प्रक्षेपित होणार
श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) नं शनिवारी 36 उपग्रह वाहून नेणारं भारतातील सर्वात मोठं LVM3 रॉकेट प्रक्षेपणासाठी सज्ज झालं आहे. आज रविवारी सकाळी ९.३० वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे रॉकेट प्रक्षेपित केलं जाणार आहे.
राजस्थानपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भूकंपाचे धक्के
राजस्थानपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, राजस्थानच्या बिकानेरमध्ये ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचवेळी अरुणाचल प्रदेशातील चांगलांग येथेही भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 मोजली गेली. शनिवार आणि रविवारी मध्यरात्री 1.45 वाजता चांगलांग येथे भूकंपाचे धक्के जाणवले. 30 मिनिटांनी बिकानेरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दोन्ही ठिकाणी जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.
मुंबईत कोरोनाने शंभरी ओलांडली
कोरोनाने मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शनिवारी मुंबईत 105 नवीन रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे राज्यात दिवसभरात 437 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. झपाटय़ाने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
मालेगावात उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा
मालेगावमध्ये आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गेल्या दोन दवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत हे मालेगावमध्ये दाखल झाले आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मालेगावमध्ये ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभेचे बॅनर लागले आहेत. मालेगाव येथील एमएसजे महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आले आहे.
चिखलीत भंगारच्या गोदामाला आग
पिंपरी : चिखलीतील कुदळवाडी येथील भंगारच्या गोदामाला अचानक आग लागली. यामध्ये भंगारचे साहित्य जळाले. आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दलाच्या पिंपरीच्या मुख्य केंद्रासह चिखली, तळवडे, भोसरी आदी उपकेंद्राच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.